कस्टम विभागाची कारवाई
प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळावर विदेशातून दाखल झालेल्या एका प्रवाशाकडून 10 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गोवा कस्टम विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी केरळच्या कासरगोड येथील नागरिकाला कस्टमने अटक केली आहे.
कस्टम विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार शारजाहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका केरळीयन प्रवाशाकडून मंगळवारी सकाळी 232 ग्रॅम तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. सदर सोन्याची किंमत सुमारे 10.03 लाख रूपये असून या प्रकरणी कस्टम विभागाने सदर प्रवाशाला अटक केली आहे.
विदेशातून येणाऱया प्रवाशांच्या नियमित तपासणीवेळी कस्टमच्या दाबोळी विमानतळावरील तज्ञ पथकाला या प्रवाशाबाबत संशय आल्याने त्यांनी त्याच्या बॅगेची कसून झडती घेतली असता त्याच्या बॅगेत सोन्याच्या कांडय़ा आढळून आल्या. कस्टमच्या अधिकाऱयांनी त्या कांडय़ा जप्त करून त्या प्रवाशालाही ताब्यात घेतले. सदर कासरगोड केरळ येथील प्रवासी एअर अरेबियाच्या विमानातून शारजाहून दाबोळी विमानतळावर उतरला होता. या प्रकरणी गोवा कस्टम विभाग अधिक तपास करीत आहे.
पंधरा दिवसातील दुसरी कारवाई गेल्या पंधरा दिवसात गोवा कस्टम विभागातर्फे करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. या वर्षात गोवा कस्टम विभागातर्फे सुमारे 1.81 कोटी रूपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. या सोने तस्करी प्रकरणांचा तपास गोवा कस्टमचे सहआयुक्त व्हाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमचे अधिकारी करीत आहेत.