कोल्हापूर / प्रतिनिधी
छत्रपती शाहू स्टेडियममध्ये चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दिलबहार तालीम मंडळ अ संघाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघावर टायब्रेकरमध्ये 3-2 अशा गोल फरकाने विजय मिळवत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. 80 मिनिटे खेळवला गेलेला हा सामना गोल शुन्यबरोबरीत सुटला होता. त्यामुळे विजेतेपदाचा फैसला करण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब केला होता. यामध्ये दिलबहारच्या सनी सणगर, प्रमोद पांडे व रोमॅरिक या तिघांनी गोल केले. सचिन पाटील व अनिकेत जाधवने मारलेल्या पेनल्टी प्रॅक्टिसचा गोलरक्षक प्रविण सिंहने आडवल्या. प्रॅक्टिस क्लबकडून जय कामत व राहुल पाटील या दोघांनाच गोल करण्यात यश आले तर प्रतीक बदामे, कैलास पाटील व प्रकाश संकपाळ या तिघांनी मिरलेल्या पेनल्टी मात्र गोललखांबाच्या बाहेर गेल्या.
बक्षीस वितरण समारंभात स्पर्धा विजेत्या दिलबहार तालीम संघाला रोख दीड लाख रुपये व महापौर चषक असे बक्षीस श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. उपविजेता प्रॅक्टिस क्लबला रोख 75 हजार रुपये व चषक असे बक्षीस देऊन गौरवले. संपूर्ण स्पर्धेत उठावदार खेळ केलेल्या पवन माळीला (दिलबहार तालीम) मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्यालाही रोख रकमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले.