ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील कोरोना संसर्गाचा विळखा वेगाने कमी होताना दिसत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारीही नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजारपेक्षा कमी आली. मागील 24 तासांत मुंबईत 1,657 नवीन रुग्णांची नोंद झाली. हा मुंबईसाठी रुग्णसंख्येचा आणखी एक निचांक ठरला आहे.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी 62 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2 हजार 572 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, मुंबईतील कोरोनाचा उद्रेक हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला होता. मात्र, महापालिकेने अत्यंत नियोजनबद्धपणे या संकटाचा सामना करत स्थिती नियंत्रणात आणली आहे. एप्रिल महिन्यात मुंबईतील दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा 11 हजारांपर्यंत पोहचला होता. हा आलेख काही आठवड्यांतच घसरला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या दोन हजारांपर्यंत खाली आली आहे.
मुंबईत आतापर्यंत एकूण 14,138 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 6 लाख 31 हजार 982 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता 92 टक्के झाले आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 37,656 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर रुग्णवाढीचा दर 0.34 टक्के इतका आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता 199 दिवसांवर गेला आहे.
- आज आणि उद्या लसीकरण बंद

दरम्यान, मुंबईत 15 आणि 16 मे असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने दोन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माध्यमांना माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून विशेषत: हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.