इस्रायलच्या दूतावासानजीक स्फोट प्रकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीत इस्रायलच्या दूतावासानजीक झालेल्या स्फोटाची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविली आहे. मागील आठवडय़ात शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील अत्यंत सुरक्षित लुटियन्स झोन भागातील इस्रायलच्या दूतावासानजीक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली होती. स्फोटात जीवितहानी झाली नसली तरीही दूतावासासमोर उभ्या असलेल्या 5 वाहनांचे नुकसान झाले होते.
एनआयए चौकशीसंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी अधिसूचना काढली आहे. या प्रकरणाचा तपास आतापर्यंत दिल्ली पोलिसांची विशेष शाखा करत होती. प्रारंभिक तपासात काही इराणी संशयितांभोवती संशयाची सुई फिरत आहे. पण दिल्ली पोलिसांकडून आता पूर्ण केस डायरी, एफआयआर आणि सर्व पुरावे एनआयएला सोपविण्यात येणार आहेत. एनआयएचे पथक नव्याने पूर्ण प्रकरण हाताळणार आहे. स्फोटानंतर एनआयएच्या पथकानेही इस्रायलच्या दूतावासानजीक दौरा केला होता.
बीटिंग रिट्रीट समारंभाचे स्थळ असलेल्या विजय चौकापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता. या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत अनेक महनीय उपस्थित होते. स्फोटाच्या ठिकाणावरून तपासकर्त्यांनी इस्रायलच्या दूतावासातील अधिकाऱयांशी संबंधित एक पत्र हस्तगत केले आहे.
नेतान्याहूंची मोदींशी चर्चा
पंतप्रधान नरदें मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणात या स्फोटाच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. इस्रायलचे मुत्सद्दी आणि दूतावासाच्या सुरक्षेला भारत अत्याधिक महत्त्व देत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी या संदर्भात भारतीय आणि इस्रायली सुरक्षा यंत्रणांमधील घनिष्ठ समन्वयाविषयी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलच्या मुत्सद्यांना पूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे.