एक हजार कोटीचा प्रकल्प : केजरीवाल सरकारचा उपक्रम,क्रीडा क्षेत्रात गोवा उदासीन : राहुल म्हांबरे

प्रतिनिधी /पणजी
शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात गोवा सरकारची अक्षम्य उदासीनता दिसून येत असतानाच दिल्लीत मात्र केजरीवाल सरकारने शिक्षणावर प्रचंड भर दिला असून चक्क क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी पाऊले उचलली आहेत. देशातील अशाप्रकारचे जागतिक दर्जाचे असे हे पहिले विद्यापीठ ठरणार असून त्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात म्हणजेच 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतील शाळांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरण अवलंबले आहे. याच अनुषंगाने भविष्यातील ऑलिम्पियन तयार करण्याच्या उद्देशाने देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ सुरु करत आहे. या विद्यापीठात खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण, पोषण आणि उपकरणे देखील प्रदान करण्यात येणार आहेत.
दिल्लीत भारताचे पहिले क्रीडा विद्यापीठ
गतवषी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मुंडका येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे विद्यापीठ खेळाडूंना पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट, क्रिकेट आणि हॉकी यासारख्या खेळांमध्ये पदव्या देणार आहे. कॅम्पसमध्ये युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ स्पोर्ट्स हेल्थ सायन्स, स्पोर्ट्स एथिक्स ह्युमॅनिटीज ऍण्ड सोशल सायन्स, स्पोर्ट्स इकॉनॉमिक्स ऍण्ड मॅनेजमेंट, स्पोर्ट्स आर्किटेक्चर, फिजिकल एज्युकेशन ऍण्ड टीचर टेनिंग असेल. त्याशिवाय 1 हजार आसन क्षमता असलेले केंद्रीय ग्रंथालय, ई-बुक सुविधा, क्रीडा विज्ञान केंद्र देखील असेल. सर्व खेळाडू/विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकासह कॅम्पसमध्ये 24 तास सहज घालवू शकतील, अशी कॅम्पसची रचना असेल. या विद्यापीठात इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल आणि त्यांना सुरुवातीपासूनच विशिष्ट खेळांचे प्रशिक्षण दिले जाईल, असे म्हांबरे म्हणाले.
सुमारे 1 हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून 79 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱया या पूर्णपणे निवासी कॅम्पस असलेल्या विद्यापीठात सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यात दोन फुटबॉल मैदान, दोन्ही बाजूला 125 मीटरच्या सराव खेळपट्टय़ांसह ऍथलेटिक्ससाठी ट्रक, 2 व्हॉलीबॉल कोर्ट, 2 बास्केटबॉल कोर्ट, 50 मीटर शूटिंग एरिना, धनुर्विद्या क्षेत्र, हॉकी टर्फ, लॉन टेनिस कोर्ट (3 कृत्रिम, 3 चिकणमाती), खुले अँफीथिएटर, यासारख्या सुविधा असतील.
त्याशिवाय सुमारे 12 मीटर उंचीच्या इनडोअर हॉलमध्ये 8-10 बॅडमिंटन कोर्ट, 1 व्हॉलीबॉल कोर्ट, 1 बास्केटबॉल कोर्ट, ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव, स्टीम आणि सौना स्टेशन व्यवस्थेस ड्रायव्हिंग पूल असलेले जलकेंद्र, कुस्ती, बॉक्सिंगचे बहुमजली इनडोअर हॉल, तायक्वांदो, बुद्धिबळ, कबड्डी, टेबल टेनिस (16 टेबल) साठी बहुमजली इनडोअर हॉल, चेंजिंग रूम, वॉशरूम, कोच रूम, स्टोअर रूम आदी क्रीडा सुविधा असतील, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सादर केलेल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 26 टक्के म्हणजेच सुमारे 15,601 कोटी रुपये ठेवले आहेत. क्रीडा संकुलांसह शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी रु. 7818 कोटी देण्यात आले आहेत.
क्रीडापटूंना प्रशिक्षण, पोषण, उपकरणे सुनिश्चित करणे
क्रीडापटूना प्रशिक्षणाबरोबरच पोषणही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारने खेळाडूंसाठी पोषण, उपकरणे सुनिश्चित केली आहेत. या सर्व बाबींवर योग्य लक्ष केंद्रित केल्यामुळे दिल्लीच्या क्रीडा स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी खेळांमध्ये रस दाखवत असून अनेकांनी प्रति÷ित पदके देखील प्राप्त केली आहेत. दिल्ली सरकार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार देखील प्रदान करते, असे म्हांबरे यांनी सांगितले.