क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत एफसी गोवाने आरामात प्रवेश मिळविला. काल कोलकातातील कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या उपान्त्यपूर्व लढतीत एफसी गोवाने दिल्ली एफसीवर 5-1 गोलानी एकतर्फी विजय नोंदविला.
पूर्ण वेळेतील लढतीवर काल निर्विवादपणे एफसी गोवाचे वर्चस्व आढळून आले. पहिल्या सत्रात देवेंद्र मुरगावकर, मुहम्मद नेमील आणि ब्रँडन फर्नांडिस यानी केलेल्या गोलमुळे एफसी गोवाने 3-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. दुसऱया सत्रात एफसी गोवासाठी स्टॉपर बॅक लियांडर डिकुन्हा आणि मीडफिल्डर आलेक्सझांडर रोमारियो जेसूराज यांनी गोल केले.
पहिल्या दहा मिनिटांच्या खेळावर काही प्रमाणात दिल्ली एफसीने आक्रमक चाली रचून गोलरक्षक धीरज सिंगवर दबाव आणला होता. या दरम्यान धीरजने त्यांचा अनुभवी स्ट्रायकर विलीस प्लाझाचे दोन फटके अडविले. सामन्याच्या 15व्या मिनिटाला एफसी गोवाने आपला पहिला गोल केला. मुहम्मद नेमील आणि सॅन्सन परेराने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर देवेंद्र मुरगावकरने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले व चेंडू जाळीत सारला. त्यानंतर लगेच आलेक्सझांडर रोमारियो जेसूराजच्या पासवर मुहम्मद नेमीलने एफसी गोवाचा दुसरा आणि स्पर्धेतील आपला चौथा गोल केला.
दोन गोलांच्या आघाडीनंतर एफसी गोवाची आक्रमणांची धार आणखी धारदार झाली. एफसी गोवाचा तिसरा गोल त्यांचा फ्रिकीक एक्सपर्ट ब्रँडन फर्नांडिसने केला. दुसऱया सत्रात प्रशिक्षक जुआन फरांडोने आपल्या अनुभवी ब्रँडन फर्नांडिस, एदू बेडिया आणि आल्बेर्तो नोगुएरा यांना विश्रांती दिली आणि ग्लॅन मार्टिंन्स, प्रिन्सटन रिबेलो व रिदीम त्लांग यांना संधी दिली.
दिल्ली एफसी संघाचा एकमेव गोल लढतीच्या 82व्या मिनिटाला त्यांचा बदली खेळाडू निखिल माळीने केला. या गोलनंतर दुसऱयाच मिनिटाला लियांडर डिकुन्हाने एफसी गोवाचा गोल करून संघाची आघाडी 4-1 अशी केली. लढतीच्या शेवटच्या मिनिटाला सावियर गामाच्या पासवर आलेक्सझांडर रोमारियो जेसूराजने एफसी गोवाचा पाचवा गोल करून संघाला 5-1 असे विजयी केले. आता उपान्त्य लढतीत एफसी गोवाचा सामना 29 सप्टेंबर रोजी बेंगलोर एफसी आणि आर्मी ग्रीन यांच्यातील विजेत्या संघाशी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर होणार आहे.