विधानसभा निवडणुकीत आपच्या जाहिरात खर्चाची केली चौकशी
प्रतिनिधी /पणजी
फेब्रुवारी 2022 मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याबद्दल दिल्ली सीबीआयने नुकतेच गोव्यातील सर्व 12 गटविकास अधिकाऱयांचे जबाब नोंदविले आहेत.
आम आदमी पक्षाने गोव्यासह पंजाब आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी केलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करून दिल्लीतील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार सीबीआयकडून संबंधित सर्व राज्यांमध्ये चौकशी सुरू आहे.
त्याच अनुषंगाने सीबीआयच्या पथकाने अचानक गोव्यात भेट दिली. प्रत्यक्षात त्यांनी राज्यातील सर्व 191 ग्रामपंचायतींना भेट देऊन तपास करायचा होता. परंतु मर्यादित कालावधित एवढी माहिती गोळा करणे शक्य नसल्यामुळे सीबीआय पथकाने सर्व 12 गटविकास अधिकाऱयांचे जबाब नोंदविले.
या निवडणुकीदरम्यान ‘आप’ने केलेला एकूण खर्च, चौकशी करत आहे आणि होर्डिंग्ज लावण्यासाठी ग्रामपंचायतींकडून मिळविलेल्या परवानग्या आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या जाहिरात एजन्सी यांचा तपशील सीबीआय गोळा करत आहे.
गटविकास अधिकाऱयांनी आपल्या संबंधित तालुक्मयातील ग्रामपंचायतींकडून नोंदी गोळा करून सीबीआय पथकाला सादर केल्या. त्यानंतर त्यांनी त्यांचे जबाबही नोंदवले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने केलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त खर्चाच्या चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय पथकाने दोन आठवडय़ांपूर्वीच पणजीत पंचायत संचालनालय कार्यालयात भेट दिली होती. तेथे त्यांनी ‘आप’ ने होर्डिंग्ज लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडून मिळविलेल्या परवानग्या तसेच जाहिरात करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीची नावे यासंबंधी माहितीची मागणी केली होती, अशी माहिती संचालनालयातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीत झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपने 39 उमेदवार उतरविले होते. त्यापैकी दोन विजयी उमेदवारांच्या माध्यमातून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत प्रवेश मिळविला होता.