- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकट काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासियांना मुफ्त रेशन आणि आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील 72 लाख रेशन कार्ड धारकांना 2 महिनेे मोफत रेशन आणि रिक्षा व टॅक्सी चालकांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीमधील रेशन कार्ड धारकांना पुढील 2 महिने मोफत रेशन दिले जाणार आहे. दिल्लीत 72 लाख रेशनकार्ड धारक आहेत. याचा अर्थ असा नाही की, लॉकडाऊन 2 महिने चालणार आहे.

पुढे ते म्हणाले, यासोबतच रिक्षा – टॅक्सी चालकांना 5 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे जेणे करून या आर्थिक तंगीमध्ये त्यांना थोडी मदत होईल. याचा फायदा साधारण दीड लाख रिक्षा – टॅक्सी चालकांना होणार आहे.
- मागील 24 तासात राजधानीत 448 मृत्यू

दरम्यान, मागील 24 तासात दिल्लीत 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. तर सोमवारी 18,043 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 12 लाख 12 हजार 989 वर पोहोचला आहे. त्यातील 11,05,983 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.