यावर्षी दर काहीसा कमी असल्यामुळे सोने-चांदीची खरेदी उत्तम प्रकारे होण्याचा सुवर्णकारांना विश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
तेजोमय दिवाळीला सोने खरेदीसाठी महत्त्व दिले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्यादिवशी सोने-चांदी खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. मागील वषी कोरोनामुळे खरेदीसाठी तितकासा उत्साह नव्हता. सोन्याचा दरही वाढला होता. परंतु यावर्षी सोन्याचा दर काहीसा कमी असल्यामुळे तसेच इतर व्यवसायही रुळावर आल्यामुळे सोने-चांदीची खरेदी उत्तम प्रकारे होईल, असा अंदाज सुवर्णकारांना आहे. त्यामुळे नवीन दागिन्यांनी सुवर्णपेढय़ा झळाळू लागल्या आहेत.
दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन, भाऊबीज, पाडवा यासाठी सोने खरेदी केली जाते. विशेषतः उत्तर भारतीय लोक धनत्रयोदशीला चांदीची खरेदी करतात. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी केली जाते. लक्ष्मी पूजनासाठी चांदीची लक्ष्मी, देवाच्या मूर्ती, नाणी, चांदीचे दिवे, पूजेच्या वस्तू, तांब्या, यासह इतर साहित्य खरेदी केले जाते. दिवाळीनंतर विवाहाचे मुहूर्त असल्याने दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीतून सुरुवात केली जाते.
विश्वासार्ह गुंतवणूक
इतर मालमत्तेत गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली फायदेशीर ठरू शकते. त्यामुळेच नागरिकांकडून सोने खरेदीला पहिले प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्याही अडचणीवेळी सोने गहाण ठेवून ताबडतोब रक्कम उपलब्ध होते. पुढील काळात सोन्याचा दर हा चढाच असल्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक विश्वासार्ह मानली जात आहे. त्यामुळेच सोने-चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
दर कमी असल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल

हिंदू नागरिक दिवाळीच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यावषी दर कमी असल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सोन्या-चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य, लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. धनत्रयोदशीदिवशी चांदी खरेदी केली जाते. बलिप्रतिपदेला सोने खरेदी केले जात असल्याने त्या पद्धतीने दागिने तयार करण्यात आले असल्याचे संजय पोतदार यांनी सांगितले.
संजय पोतदार (पोतदार ज्वेलर्स)
गुरुपुष्यामृत मुहूर्तावर-पाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी तेजीत होईल

यंदाच्या दिवाळीमध्ये सोने-चांदीची खरेदी मोठय़ा प्रमाणात होईल, अशी सुचिन्हे दिसत आहेत. गतवषीच्या तुलनेत यंदा सोन्याचा दर काही प्रमाणात उतरला आहे. मुख्य म्हणजे गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणून लोक सोने खरेदी करत आहेत. चोख सोन्यावर योग्य परतावा मिळतो, हेसुद्धा सोने खरेदीचे कारण आहे. गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर तसेच दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी तेजीत होईल आणि या दिवाळीला सराफांना अच्छे दिन येतील, असा विश्वास अणवेकर गोल्डचे मंजुनाथ अणवेकर यांना आहे.
मंजुनाथ अणवेकर (अणवेकर गोल्ड)