जकार्ता / वृत्तसंस्था
दुखापतीने झगडत असलेल्या भारतीय शटलर एचएस प्रणॉयला इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला चीनच्या झाओ जून पेंगने शनिवारी 21-16, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये नमवले.
जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी असलेल्या प्रणॉयला वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमधील दोनवेळच्या कांस्यजेत्या पेंगविरुद्ध 40 मिनिटांच्या लढतीत फारसा सूर सापडला नाही. दोन्ही गेम्समध्ये प्रारंभी झुंज दिली असली तरी निर्णायक टप्प्यात त्याची बरीच निराशा झाली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये या उभयतातील ही पहिलीच लढत ठरली. इंडोनेशिया ओपनमधील उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही प्रणॉयची दुसरी वेळ ठरली. प्रणॉयला रॅलीजमध्ये वेग राखता न आल्याचा बराच फटका बसला.