प्रतिनिधी/ निपाणी
दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजता निपाणी-चिकोडी मार्गावर महात गोडावून नजीक घडली. या अपघातात प्रमोद तात्यासाहेब पाटील (वय 30 रा. पीरवाडी, ता. चिकोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. विनायक प्रधानी (वय 35 रा. विजापूर), सदाशिव मारुती पाटील (वय 30 रा. प्रभूवाडी, चिकोडी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, दुचाकी क्र. (केए 28 ईएच 1544) ही घेऊन निपाणीहून चिकोडीच्या दिशेने विनायक व सदाशिव हे जात होते. त्याचवेळी पीरवाडीहून नव्या घेतलेल्या दुचाकी पल्सरवरून वायरमन म्हणून काम करत असलेला प्रमोद निपाणीच्या दिशेने येत होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर आलेल्या दुचाकीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात प्रमोद, सदाशिव व विनायक हे गंभीर जखमी झाले.
या तिघांना रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात आणताना वाटेतच प्रमोद याचा मृत्यू झाला. तर विनायक व सदाशिव यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खडकलाट पोलीस स्थानकाचे हवालदार ए. ए. जरळी, सुरज बारगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साहाय्यक उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल अधिक तपास करीत आहेत.