‘त्या’ मेसेजने प्रशासनाची तारांबळः करुळ घाटात ‘मॉकड्रिल’
प्रतिनिधी / वैभववाडी:
करुळ घाटात दुचाकीस्वार दरीत कोसळल्याचा मेसेज आला आणि प्रशासनाची तारांबळ उडाली. रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, पोलीस व महसूल विभाग खडबडून जागे झाले. मिळेल त्या वाहनाने यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्या दुचाकीस्वाराचा मृतदेह बाहेर काढण्याची लगबग सुरू झाली. आजूबाजूच्या नागरिकांना काय सुरू आहे, हे कळेना! मात्र, ही एक आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याचे स्पष्ट झाले अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस बाकी आहेत. पावसाळय़ात घाटमार्ग धोकादायक असतात. अचानक एखादी आपत्ती ओढवू शकते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापन कसे असेल, याची रंगीत तालीम यंत्रणेकडून घेतली जाते. त्यातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती सक्षम आहे, याचा अंदाज घेतला जातो. असाच एक मेसेज सकाळी 10 वाजता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला आला. करुळ घाटातील एका धोकादायक वळणावर दुचाकीस्वार खोल दरीत कोसळला असल्याचा तो मेसेज होता. या मेसेजनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
रंगीत तालीम यशस्वी
तहसीलदार रामदास झळके, मंडळ अधिकारी श्री. पावसकर, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, महिला पोलीस हवालदार माधुरी अडुळकर, हेडकॉन्स्टेबल श्री. सावंत, पोलीस नाईक मारुती साखरे, गणेश भोवड, पद्मिनी मयेकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धर्मे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक दलाची टीमही दाखल झाली. त्यांच्या मदतीने या खोटय़ा अपघातातील चालकाला दरीबाहेर काढण्यात आले.