कमतनूर येथील घटना : तीन जण जखमी
प्रतिनिधी/ संकेश्वर
रस्त्याकडेला थांबलेल्या दोघांना दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री कमतनूर येथे घडली. शंकर निंगाप्पा हिरेकोडी (वय 65, रा. कमतनूर) असे मृताचे तर मनोजकुमार कृष्णाप्पा, दिनेश चिक्कभैराप्पा (रा. गणेशपूर, बेळगाव) व बी. बी. पाटील (रा. कमतनूर) असे जखमींची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, बुधवारी दिनेश चिक्कभैराप्पा व मनोजकुमार कृष्णाप्पा हे दुचाकीने चिकोडीहून बेळगावकडे येत होते. त्यांची दुचाकी कमतनूर येथे आली असता तेथे रस्त्याकडेला शंकर हिरेकोडी व बी. बी. पाटील थांबले होते. त्यावेळी दिशेनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची शंकर व पाटील यांना जोराची धडक बसली. यात शंकर गंभीर तर दिनेश, मनोजकुमार व पाटील हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी संकेश्वर शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शंकर यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.