अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा सपाटा
प्रतिनिधी/ बेळगाव
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत तिसरा रेल्वेगेट ते पिरनवाडीपर्यंतच्या दुभाजकावरील शोभेची झाडे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. एरव्ही स्वच्छता करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येते. मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा सपाटा सुरू आहे.
शहरातील विविध ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचलेले असतात. त्यामुळे स्वच्छता करण्याची मागणी केली जाते. तसेच दुभाजकाच्या शेजारी व दुभाजकावर अस्वच्छता निर्माण होऊन कचरा साचलेला असतो. सदर कचरा हटविण्याबरोबरच दुभाजकावरील कचरा हटवून शोभेची झाडे लावण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. पण अधिवेशन येताच स्वच्छता करण्याची जाग मनपाच्या अधिकाऱयांना येते. तर दहा दिवसांच्या अधिवेशनासाठी कोटय़वधी निधीचा चुराडा करून विकासकामे राबविण्यासाठी आटापिटा सुरू असतो.
वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱया शहरवासियांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. मात्र आठ दिवसांच्या दौऱयावर येणाऱया मंत्री व आमदारांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तिसरा रेल्वेगेट ते पिरनवाडीपर्यंतच्या दुभाजकावरील शोभेची रोपे तसेच कचरा हटवून स्वच्छता करण्याची मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. काही ठिकाणी शोभेची झाडे चांगली असतानाही जेसीबीने हटविण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी झाडे हटविण्यास विरोध केला. तसेच चांगली असलेली झाडे कशाला काढता? अशी विचारणा जेसीबी चालकाकडे केली. त्यामुळे काहीवेळ कामबंद ठेवण्यात आले. मात्र नागरिक निघून जाताच जेसीबी चालकाने आपले काम पुन्हा सुरू केले. तर एरव्ही पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जाते. मात्र अधिवेशनाच्या नावावर निधी लाटण्यासाठी दिखाऊपणाची कामे करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला.