पश्चिम बंगालमधील शक्तीचे प्रतीक
आता जागतिक स्तरावर
भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यांनी आपली धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपली आहे. या परंपरेवर रामायण आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांचा आणि स्थानिक रुढींचा प्रभाव दिसून येतो. जगभरातील अशा परंपरांना युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिले जाते. 2017 मध्ये युनेस्कोने (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक ऍण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) कुंभमेळय़ाला जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिले होते. आता याच सांस्कृतिक वारसा यादीत (हेरिटेज) बंगालमधील दुर्गापूजेला स्थान देण्यात आले आहे. ‘युनेस्को’च्या या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला. पश्चिम बंगाल सरकारने दुर्गापूजेला हेरिटेज दर्जा देण्याची विनंती ‘युनेस्को’कडे केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे. साहजिकच युनेस्कोच्या या मान्यतेमुळे कोलकात्याची दुर्गा पूजा आता जगभरात अधिकच प्रसिद्धी मिळणार आहे.
ऐतिहासिक परंपरा...

शरद ऋतूत साजरा होणारी दुर्गापूजा पश्चिम बंगालमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिकतेचे प्रतीक बनले आहे. पश्चिम बंगालच नव्हे, तर बिहार, ओडिशा, आसाम आणि अन्य राज्ये जेथे बंगाली लोक राहतात, तेथेही दुर्गा पूजनाचा उत्सव होतो. दुर्गामातेचा आशीर्वाद मिळविण्यासोबतच महिषासुरावर तिने मिळविलेल्या विजयाचा उत्सव म्हणूनही नवरात्रीत दुर्गापूजा केली जाते. अशीही आख्यायिका आहे की भगवान रामाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी दुर्गामातेची पूजा केली होती.
भक्तीभावाचा उत्सव…
नवरात्र साधारण ऑक्टोबर महिन्यात येते. दहा दिवस हा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. षष्टी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी साजरी केली जाते. या प्रत्येक दिवशी महाप्रसाद दिला जातो. दहाव्या दिवशी दसऱयाला दुर्गादेवीची मिरवणूक काढली जाते. ‘ढाक’ या पारंपरिक वाद्याच्या तालावर दुर्गादेवी विसर्जन नदी अथवा तलावात केले जाते. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरुपात हा उत्सव होतो. त्यासाठी तात्पुरते मंडप उभारले जातात. देवीच्या मूर्तीला पारंपरिक दागिने, आभूषणे, फुले यांनी सजविले जाते.
विराट मूर्ती अन् आकर्षक सजावट
या उत्सवादरम्यान प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वातावरण आणि वेगवेगळय़ा कल्पना असतात. दुर्गादेवीच्या विराट मूर्ती विराजमान असतात. काही मंडप तर एकदम आगळेवेगळे, अफलातून ध्वनी-प्रकाश योजनेने सजवलेले असतात तर काही अगदी साधे पण मोहक असतात. रोज संध्याकाळी ढोलांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर होणाऱया महाआरतीत भाग घेणे आणि त्यामुळे येणाऱया ध्यानमय तंद्रीचा अनुभव घेणे हे सर्वच भाविकांसाठी विशेष आकर्षण असते.
बंगालमध्ये दुर्गापूजेचे दोन प्रकार
कोलकात्यात उत्सव सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन प्रकारात साजरा केला जातो. उत्तर आणि दक्षिण कोलकात्यातील धनवान लोक ‘बारीर’ परंपरेनुसार हा उत्सव घरी साजरा करतात. त्यासाठी कुटुंबातील सर्व लोक एकत्र येतात. तर ‘पारा दुर्गा पूजा’ सार्वजनिक स्वरुपात साजरी केली जाते. पारा दुर्गा पूजा ही सहसा पंडाल आणि कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित केली जाते. उत्तर कोलकाता आणि दक्षिण कोलकाता येथे बारीर परंपरेनुसार दुर्गा पूजा केली जाते. ही पूजा सामान्यतः श्रीमंत घरांमध्येच केली जाते.
पूर्व भारतातील सर्वात मोठा उत्सव

बंगालमध्ये सर्वत्र नवरात्र ‘दुर्गापूजा’ ह्या नावाने साजरी केली जाते. या सणासाठी कित्येक महिने आधीपासून पूर्वनियोजन केले जाते. पश्चिम बंगालप्रमाणेच देशाच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस ‘दुर्गा पूजा’ म्हणून साजरे केले जातात. दुर्गा देवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते. सिंह हा धर्म आणि इच्छाशक्ती दर्शवतो तर शस्त्रे लक्ष्य आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हवी असलेली तीव्रता सूचित करतात. आठवा दिवस हा परंपरेनुसार दुर्गाष्टमीचा असतो. महिषासुराचा वध करताना दर्शविणाऱया दुर्गा देवीच्या मूर्ती उत्कृष्टपणे रेखाटून आणि सजवून मंदिरात आणि इतर ठिकाणी ठेवलेल्या असतात. ह्या मूर्तींचे पाच दिवस पूजन केले जाते आणि पाचव्या दिवशी नदीत विसर्जन केले जाते.
‘दशहरा’ लोकप्रियतेचे कारण…
बंगाली महाकवी कृत्तिदास ओझा यांनी सर्वप्रथम वाल्मिकी रामायणाचा बंगाली भाषेत पद्यानुवाद (कृत्तिदास रामायण-श्रीराम पाँचाली) केला. संस्कृत व्यतिरिक्त अन्य उत्तर भारतीय भाषेतील हे पहिलेच रामायण होते. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस येण्यापूर्वी 100 वर्षे पूर्वी कृत्तिदास रामायणाची रचना केली गेली. मात्र, हा ग्रंथ म्हणजे रामायणाचा शब्दानुवाद नाही. तर मध्यकालीन बंगाली समाज आणि संस्कृतीचे चित्रण यामध्ये आहे. समाजातील न्याय आणि अन्याय यातील द्वंद्व कृत्तिदास यांनी मांडले. सत्य, न्याय आणि प्रेमाचाच अंतिम विजय होतो. रावण आणि त्याच्या सहकाऱयांना एक दिवस हार पत्करावी लागते, असे त्यांनी मांडले होते. याच कृत्तिदास रामायणाने बंगालमध्ये ‘दशहरा’ लोकप्रिय बनला.
13 उत्सव, परंपरा ‘युनेस्को’च्या यादीत

आतापर्यंत भारतातील 13 उत्सव, परंपरा, कला यांना ‘युनेस्को’ने सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. त्यात आता दुर्गापूजेचा समावेश करण्यात आला आहे. यात राजस्थानमधील कालबेलिया समाजाची पारंपरिक गीते आणि नृत्य, केरळ येथील संस्कृत रंगभूमी, पूर्व भारतातील छाऊ नृत्य, पंजाबमधील जंडियाला गुरू ठठेला, मणिपूर येथील वैष्णव समूदायाचे संकीर्तन, केरळमधील पारंपरिक नृत्य नाटिका, भारतातील प्राचीन योगविद्या, उत्तराखंडातील रम्माण उत्सव, उत्तर भारतातील रामलीला, लडाखमधील बौद्ध जप, भारतातील प्राचीन वेद परंपरा, नवरोज या उत्सव आणि परंपरांचाही समावेश आहे.
कुंभमेळय़ाचीही युनेस्कोकडून दखल
या आधी कुंभमेळा हा शांततेत एकत्र येऊन साजरा केला जाणारा पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव असल्याची दखल युनेस्कोने घेतली होती. मंत्र आणि उपदेशांद्वारे गुरुद्वारे शिष्यांना ज्ञान देण्याची परंपरा कुंभमेळय़ातून चालविली जाते. 2010 मध्ये युनेस्कोने कुंभमेळय़ाला जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिले होते.
युनेस्कोची भूमिका
मजबूत सांस्कृतिक घटकांच्या अंतर्भावाशिवाय कोणताही विकास शाश्वत ठरू शकत नाही, अशी ‘युनेस्को’ची भूमिका आहे. परस्पर आदर आणि मुक्त संवादावर आधारित विकासासाठी मानवकेंद्रीत दृष्टीकोनच चिरस्थायी आणि सर्वसमावेशक ठरू शकतो. तरीही अलीकडील विकासाच्या संकल्पनेतून संस्कृती हरवत चालल्याचे दिसत आहे. विकासाची धोरणे आणि प्रक्रिया यामध्ये संस्कृतीचे योग्य स्थान आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्रिआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे. स्पष्ट धोरणे आणि कायदेशीर चौकट निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समूदायांशी संलग्नता, स्थानिक पातळीवर संस्कृती आणि तिच्या विकासासाठी समर्थन, वारसा संरक्षण आणि सर्जनशील उद्योगांना बळकटी, सांस्कृतिक वैविधतेला पाठबळ अशा स्वरुपात हे काम चालते.

परदेशातील काही उत्सव
‘युनेस्को’च्या यादीत परदेशातील अनेक सांस्कृतिक, कला आणि उत्सवांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात स्पेनच्या मानवी मनोऱयांचाही समावेश आहे. या मानवी मनोऱयांचा प्रत्यय मुंबईतील दहीहंडी उत्सवादरम्यान येतो. तेथे दहीहंडी उत्सवासाठी स्पेनच्या पथकांनाही आमंत्रित केले जाते. याशिवाय स्वित्झर्लंडमधील वाईनग्रोवर्स फेस्टिव्हल, जपानमधील यामा, होको आणि याताई फ्लोट फेस्टिव्हल, चीनमधील ड्रगन बोट फेस्टिव्हल यांनाही ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाले आहे.
‘युनेस्को’च्या यादीतील भारतीय संस्कृतीची अमूर्त प्रतीके
1. कालबेलिया ः राजस्थानातील कालबेलिया समाजाची पारंपरिक गीते आणि नृत्य
2. कुंभमेळा ः प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक येथे दर चार वर्षांनी होणारा उत्सव
3. कुट्टीअट्टम ः केरळ येथील संस्कृत रंगभूमी
4. छाऊ नृत्य ः पूर्व भारतातील लोककला, स्थानिक लोककथांसह रामायण, महाभारतातील भागांचे सादरीकरण
5. जंडियाला गुरू ठठेला ः पितळ आणि तांब्याच्या भांडय़ांच्या निर्मितीची पंजाबमधील पारंपरिक शिल्पकला
6. संकीर्तन ः मणिपूर वैष्णव समूदायातील कृष्णभक्तीवर आधारित गीत आणि नृत्य सादरीकरण
7. मुडियेट्टू ः केरळमधील एक पारंपरिक नृत्य नाटिका.
8. योगविद्या ः भारतातील प्राचीन विद्या
9. रम्माण उत्सव ः उत्तराखंड राज्यातील सलूर -डुंगरा नामक गावात होणारा भूमियाल देवाचा उत्सव
10. रामलीला ः उत्तर भारतात दसऱयादरम्यान होणारा उत्सव
11. बौद्ध जप ः लडाखमधील गावांमध्ये होणारा गौतम बुद्धांच्या ग्रंथांचा जप
12. वैदिक जप ः भारतातील प्राचीन वेद परंपरा
13. नवरोज ः मुस्लीम नववर्ष 21 मार्च
……
दुर्गापूजा ही आपल्यासाठी उपासनेपेक्षा मोठी आहे. दुर्गापूजेला हेरिटेजचा दर्जा मिळणे ही प्रत्येक बंगालीसाठी अभिमानाची बाब आहे.
– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल
सांस्कृतिक वारसा म्हणजे केवळ चिन्हे आणि वस्तुंचा संग्रह नसून, त्यात आपल्या पूर्वजांच्या परंपरा आणि भावनांचा समावेश होतो. आम्ही भारत आणि भारतीयांचे अभिनंदन करतो. दुर्गापूजेचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर स्थानिक लोक आनंदित होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
– युनेस्कोचे ट्विट
– संकलन ः राजेश मोंडकर, सावंतवाडी