भरदिवसा तरूणी, महिलांचा बिनदिक्कत वावर
प्रतिनिधी/ चिपळूण
गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेली चिपळूण भरबाजारपेठेतील भाजी मंडई इमारत अनैतिक व्यवसायाचे मुख्य केंद्र बनत असल्याची चर्चा आहे. खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शहरातून चालणाऱया या व्यवसायाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही अशा प्रकारांवर वचक नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिपळूणची ओळख सुसंस्कृत नगरी अशी आहे. असे असताना याच शहरात वेश्या व्यवसाय उघडकीला येणे नवे नाही. अनेक वर्षापासून छुप्या पध्दतीने व लहान स्वरुपात येथे हा व्यवसाय सुरू आहे. काही वर्षापूर्वी काविळतळी येथे एक महिला रंगेहाथ पकडण्यात आली होती. याप्रकरणी अनेकांना अटकही झाली होती. एक हॉटेलही या व्यवसायासाठी प्रसिध्द होते. मात्र एक शाळकरी मुलगी काही मुलांसोबत पकडल्यानंतर या हॉटेलला उतरती कळा लागली. आज ते हॉटेल अखेरची घटका मोजत आहे. सध्या मात्र शहरातील अनेक हॉटेल्स या व्यवसायामुळे बदनाम होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत असलेल्या भाजी मंडई इमारतीला या व्यवसायाने आपल्या कवेत घेतल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी येथे अनधिकृत भाजी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालत होता. त्यामुळे येथे हमालांसह ग्राहक व कर्मचाऱयांची पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वर्दळ असायची. आता हा व्यवसाय बंद झाल्याने येथे कोणीही नसल्याचा फायदा घेत काही तरूणी व महिला रात्रंदिवस येथे वावरत असल्याचे दिसून येत आहे. येथून सर्व सूत्रे हलत असून येथे ‘व्यवहार’ व पुढील ठिकाणे ठरत असल्याची चर्चा आहे. याच इमारतीच्या खालचा भाग दारूचा अड्डा बनला आहे.
जुना बसस्थानक परिसरही अनैतिक प्रकरणांमुळे आता प्रकाशझोतात येत आहे. तासन्तास या परिसरात घुटमळत रहायचे आणि पुढील प्रकार करायचा असे वर्तन काही महिलांचे दिसून येत आहे. त्यामुळे या शहराला बदनामीपासून वाचवायचे असेल तर पोलीस व नगर परिषदेला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तैनात पोलिसांना या सेवेबरोबरच पोलीस म्हणून आपली अन्य बरीच कर्तव्ये आहेत याचे भान ठेवावे लागणार आहे. हे प्रकार दिवसा घडत असून, याची माहिती असूनदेखील कोणीही याची तक्रार करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खेर्डीतील प्रकारामुळे उघड चर्चा
काही दिवसांपूर्वी खेर्डी येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याचे उघड झाल्यानंतर शहरातील या प्रकारांची खुलेआम चर्चा सुरू आहे. याला पायबंद घालण्यासाठी सर्वांनाच संतर्क होण्याची वेळ आली आहे.
शहानिशा करण्याचे काम सुरू- पोळ
याबाबत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला असता काहीठिकाणच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्याची शहानिशा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. यात तथ्य असल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
योग्य त्या उपाययोजना करू- डॉ. विधाते याबाबत मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, असा प्रकार होत असेल तर ते गंभीर आहे. याची खात्री करून गैरवापर होत असल्यास त्या जागी कोणीही जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील