ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चार विशेष सल्लागारांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे या सल्लागारांना काढून टाकण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
इम्रान खान यांना 20 सल्लागार आहेत. त्यापैकी केवळ एक सल्लागार निवडून आलेला आहे. 20 सल्लागारांपैकी 4 सल्लागारांचे दुहेरी नागरिकत्व आहे. पाकिस्तान सरकारने या सल्लागारांची संपत्ती व नागरिकत्वाची माहिती लपवली नाही. पारदर्शकता ठेवत सरकारने ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
इम्रान यांच्याकडे असलेले पेट्रोलियम सल्लागार नदीम बाबर आणि ऊर्जा क्षेत्र सल्लागार शहझाद कासीमयांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. डिजीटल सल्लागार तानिया एस. अर्डौस यांच्याकडे कॅनडाचे तर परराष्ट्र व्यवहार सल्लागार सय्यद झुल्फीकार अब्बास बुखारी यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. याशिवाय राजकीय सल्लागार शाहबाझ गील यांच्याकडे अमेरिकेत तात्पुरत्या निवासाचा परवाना आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी या सल्लागारांना हटवण्याची मागणी केली आहे.