प्रतिनिधी / देवगड:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने देवगड हापुस आंबा तयार होऊनही बाजारपेठ नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी आंबा बागायतदारांना बिगबझारमध्ये आंबा विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे देवगड तालुक्यातून 200 डझन आंबा विक्रीसाठी बिगबझारमध्ये पाठविण्यात आला.
कोरोनामुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडला असताना आमदार राणे यांनी आंबा बागायतदारांना मदतीचा हात दिला आहे. तसेच राज्य शासनानेही आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी वाहतूक पासही उपलब्ध करून दिल्याने वाशी मार्केटमध्ये देखील देवगड हापुस दाखल होऊ लागला आहे. लॉकडाऊनमुळे आंबा खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडू शकत नसल्याने आंबा विक्रीवर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे आमदार राणे यांनी आंबा बागायतदारांची समस्या जाणून बिग बझार व डी मार्ट अशा मॉलमध्ये आंबा विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.