दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी- दहशतवाद्यांना सुनावली शिक्षा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिजबुल मुजाहिदीच्या 4 दहशतवाद्यांना कारावासाची शिक्षा सुनावताना एनआयएच्या विशेष न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. पतियाळा हाउस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी देशद्रोहाहून मोठा कुठलाच गुन्हा असू शकत नसल्याचे उद्गार काढले आहेत. हातात बंदूक देणारे किंवा बंदूक उचलण्यासाठी प्रेरित करणारे लोक बंदूक हाती घेणाऱया गुन्हेगारांइतकेच उत्तरदायी असतात, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुन्हेगारांनी हिजबुल मुजाहिदीनच्या कारवायांसाठी रक्कम पुरविली होती. तसेच या रकमेचा वापर मालमत्तेची नासधूस आणि मानवी जीवन नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. अशा स्थितीत हत्या तसेच मालमत्ता नष्ट करण्यासाठी या लोकांना थेट स्वरुपात जबाबदार मानले जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद स्वीकारला जाऊ शकत नाही. हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी कारवायांमुळे जीव गमावणारे लोक आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी हे लोक देखील दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
फंडिंग नेटवर्क चालविणारे जबाबदार
पाकिस्तानात बसलेल्या स्वतःच्या म्होरक्यांच्या इशाऱयावर फंडिंग नेटवर्क चालविणारे दोषी हिजबुल मुजाहिदीनकडून करण्यात आलेल्या दहशतवादी कृत्यांसाठी अधिक जबाबदार आहेत. अशाप्रकारच्या फंडिंगशिवाय दहशतवादी कारवाया करणे शक्य नसते. दहशतवाद्यांना वित्तपुरवठय़ाचा प्रकार देखील दहशतवादी कृत्याच्या शेणीत ठेवण्यात यावा असे न्यायालयाला वाटते. देशाच्या मूळावर प्रहार करण्याचा कट रचण्यात आला होता आणि तसेच तो पार पाडण्याचे कृत्य केले गेल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
शिक्षेसोबत दंड
न्यायालयाने दहशतवादी मुहम्मद सैफी शाह आणि मुजफ्फर अहमद डार यांना प्रत्येकी 12 वर्षांची शिक्षा सुनावली. तर तालिब लाली आणि मुश्ताक अहमद लोणला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तर शाह याच्यावर 50 हजार रुपये, डारवर 65 हजार, लालीवर 55 हजार तर लोणवर 45 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चारही गुन्हेगारांना दहशतवादी कृत्यासाठी रक्कम जमविणे, दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असण्याच्या गुन्हय़ांसाठी दोषी ठरविण्यात आले आहे. याचबरोबर गुन्हेगारी कट रचणे आणि भारताविरोधात युद्ध पुकारणे, युद्ध पुकारण्याचा प्रयत्न, युद्ध पुकारण्यासाठी चिथावणी देण्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.