हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविघातक संघटनेवर तातडीने बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. सदर संघटना ही आतंकवादी संघटना आहे. केरळमध्ये कार्यरत असून ही संघटना देशामध्ये आता हातपाय पसरत आहे. त्यामुळे मोठी हानी होणार असून तातडीने त्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एप्रिल 2013 मध्ये केरळ पोलिसांनी त्या संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरावर छापा घातला असता त्या ठिकाणी तलवार, बॉम्ब तसेच बॉम्ब बनविण्याचा कच्चामाल मिळाला होता. याप्रकरणी 21 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या संघटनेच्या काही जणांनी पैशासाठी एकाचे अपहरण करून हत्यादेखील केली होती. केरळ उच्च न्यायालयाने ही संघटना अत्यंत घातक आहे, तेव्हा कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवी तसेच इतर हिंदू संघटनांच्या 27 जणांची हत्या या संघटनेने केली आहे. याचबरोबर 86 लोकांवर खुनी हल्लादेखील केला गेला आहे. अनेक गुन्हे या संघटनेवर दाखल झाले आहेत. तेव्हा तातडीने या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी सुधीर हेरेकर, बाबू कुरबर, नागेंद्र अष्टेकर, विनोद पाटील, सदानंद मासेकर, व्यकंटेश शिंदे, उज्ज्वला गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.