दिवसभरात 54 हजारहून अधिक नवे रुग्ण : 1,321 जणांचा बळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. देशात पुन्हा एकदा 50 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 54 हजार 069 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 68 हजार 885 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी 50 हजार 848 नव्या बाधितांची नोंद झाली होती.
देशात सलग बेचाळिसाव्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा नव्या बाधितांपेक्षा अधिक आहे. बाधित आणि डिस्चार्ज यांच्यातील फरकामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. सध्या देशात 6 लाख 27 हजार 57 इतके रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत 3 कोटी 82 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 कोटी 90 लाख 63 हजार 740 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच बुधवारपर्यंत तब्बल 3 लाख 91 हजार 981 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आतापर्यंत 30 कोटी डोस
दरम्यान, 23 जूनपर्यंत देशभरात 30 कोटी 16 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 64 लाख 89 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटी 78 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात 19 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्मयांहून अधिक आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका गडद
देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे धोका वाढल्याचे दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार हा वेगाने होत असून त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते. डेल्टा प्लसवर काय उपचार घेता येतील तसेच याच्या विरोधात शरीरात ऍन्टिबॉडीज तयार होतात का याची अद्याप माहिती नसल्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.