ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा 24 तासात नव्या कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 1 लाख 17 हजार 100 नवे बाधित आढळून आले. 30 हजार 836 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशातील पॉझिटिव्हिटी रेट 7.74 टक्के आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 3 लाख 71 हजार 363 आहे. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 71 हजार 845 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 4 लाख 83 हजार 178 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात मागील 24 तासात 36 हजार 665, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 15 हजार 421 आणि दिल्लीत 15 हजार 097 रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, भारतातील 27 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3007 एवढी आहे. त्यापैकी 1199 जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.