उत्तराखंडमधून मोदींच्या हस्ते शुभारंभ : ऑक्सिजन पुरवठय़ाची तयारी
वृत्तसंस्था /ऋषिकेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला 35 पीएसए ऑक्सिजन प्रकल्प समर्पित केले आहेत. उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील एम्समध्ये आयोजित कार्यक्रमाद्वारे याची सुरुवात झाली आहे. कोरोनाविरोधातील लढाईत ऑक्सिजन पुरवठय़ापासून लसींपर्यंत अनेक आव्हाने उभी ठाकली होती, असे पंतप्रधानांनी म्हटले ओ.
कोरोनाविरोधी लढाईत मोठी लोकसंख्या एक आव्हान होते, तसेच आमची भौगौलिक स्थिती देखील आव्हान होते. अनेक आव्हाने देशासमोर येत राहिली. देश या आव्हानांना कशाप्रकारे सामोरा गेला हे प्रत्येक देशवासीयाने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसाधारण काळात एका दिवसात 900 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनची निर्मिती व्हायची. मागणी वाढताच भारताने याची निर्मिती 10 पटीपेक्षा अधिक वाढविली. जगातील कुठल्याही देशासाठी हे अकल्पनीय होते, पण भारताने हे साध्य करून दाखविल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
युद्धस्तरावर काम
ऑक्सिजन पुरवठय़ासाठी विशेष टँकरची गरज भासते. लॉजिस्टिकच्या आव्हानांना सामोरा जात देशाने युद्धपातळीवर काम केले आहे. आम्ही जगात शक्य तिथून ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आणि ऑक्सिजन टँकर मागविले. वायुदलाची विमाने या कार्यात सामील झाली. डीआरडीओच्या मदतीने अनेक विमानांना यात सामील करण्यात आल्याने कामाला वेग मिळाला. एक लाख ऑक्सिजन कंसेंट्रेटरसाठी निधी देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
4 हजार नवे ऑक्सिजन प्रकल्प
भविष्यात कोरोनाविरोधी लढाई अधिक बळकट व्हावी, याकरता 1100 हून अधिक ऑक्सिजन प्रकल्प कार्यरत होण्यास सुरुवात झाली आहे. पीएम केयर फंडमधून प्रत्येक जिल्हा पीएसए ऑक्सिजन प्रकल्पाशी जोडला गेला आहे. देशाला 4 हजार नवे ऑक्सिजन प्रकल्प मिळणार आहेत. ऑक्सिजनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी देशातील रुग्णालये पूर्वीपेक्षा अधिक सक्षम होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती
प्रत्येक जिल्हय़ात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सुमारे 6-7 वर्षांपूर्वी काही राज्यांमध्येच एम्सची सुविधा होती. पण आता प्रत्येक राज्यात एम्स नेण्याचे काम करण्यात येत आहे. 22 एम्सचे मजबूत जाळे निर्माण करण्यासाठी 6 एम्सच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.