नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाविरोधातील युद्धासाठी केंद्र सरकारने आणखी दोन शस्त्रे सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लसी आणि एका औषधाला आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांसाठी या लसी आणि हे औषध गुणकारी ठरणार आहे.
ज्या दोन लसींना मान्यता देण्यात आली आहे, त्यांची नावे कोर्बेव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स अशी आहेत. यांपैकी कोर्बेव्हॅक्स ही लस हैदराबाद येथील बॉयॉलॉजिकल ई, अमेरिकेतील बायलॉर कॉलेज ऑफ मेडिसिन आणि अमेरिकेची कंपनी डायनाव्हॅक्स टेक्नॉलॉजीज यांची सहनिर्मिती आहे. ही लस प्रोटीन सबयुनिट प्रकारातील असून तिचे उत्पादन बॉयॉलॉजिकल ई कडून केले जाणार आहे.
कोव्होव्हॅक्स ही लस अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स या कंपनीच्या अनुमतीपत्राच्या अंतर्गत पुण्यातील सिरम कंपनीकडून उत्पादित केली जाणार आहे. ही लस सूक्ष्म कणाधारित (नॅनो पार्टिकल बेस्ड) आहे, अशी माहिती देण्यात आली.
औषधालाही मान्यता
मोलनूपिराव्हीर या औषधालाही मान्यता देण्यात आली आहे. हे औषध गोळीच्या स्वरुपातील असून त्याला प्रथम मान्यता अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने दिली आहे. ही गोळी सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. या औषधाचे उत्पादन भारतातील 13 कंपन्या करणार आहेत. ते पौढ वयाच्या आणि गंभीर धोका असणाऱया रुग्णांसाठीही उपयुक्त असून सध्या त्याचा बराच बोलबाला असल्याचे दिसून येते.
मात्र, या औषधाचा उपयोग सावधतेनेच करण्याची सूचना देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सूचनेविना त्याचा उपयोग केला जाऊ नये. केवळ इतर उपचार उपलब्ध नसतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा उपयोग करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. हे औषध कोरोना विषाणूंचा नाश करणारे आहे.
केव्हा उपलब्ध होणार…
या लसी आणि औषध भारतीय बाजारांमध्ये केव्हा उपलब्ध होणार याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र. त्यांची उपलब्धता लवकरच होईल. कोर्बेव्हॅक्स या लसीच्या 30 कोटी मात्रा (डोस) केंद्र सरकारने आरक्षित ठेवले आहेत, अशी माहिती जूनमध्ये देण्यात आली होती. ही लस गुणकारी असल्याचे परीक्षणांमधून दिसून आले असले तरी परीक्षणांची माहिती उपलब्ध झालेली नाही.