प्रतिनिधी/ धारबांदोडा
सावर्डे मतदारसंघातील धारबांदोडा व सावर्डे या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या जागा भाजपाने जिंकल्या आहे. धारबांदोडय़ातून सुधा गोविंद गावकर यांनी मगोच्या विंदा गोविंद सावंत यांचा 299 मतांनी तर सावर्डेतून भाजपाच्या सुवर्णा सुबोध तेंडुलकर यांनी मगोचे प्रदीप देसाई यांचा 1735 मतांनी पराभव केला. दोन्ही जागावर मगो व भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली.
धारबांदोडा मतदारसंघातून एकूण 4 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत सुधा गावकर व विंदा सावंत यांच्यात झाली. सुधा यांना 4380 तर विंदा यांना 4081 मते मिळाली. अपक्ष उमेदवार प्रियांका देसाई यांना 525 तर सपना वेळीप यांना 481 मते मिळाली. धारबांदोडय़ातील एकूण 23 बुथपैकी मगोला 12 बुथावर आघाडी मिळाली. भाजपाने 11 बुथावर आघाडी घेतली. धारबांदोडा, साकोर्डा, मोले व कुळे-शिगाव या पंचायतींचा समावेश असलेल्या धारबांदोडा जिल्हा मतदारसंघात धारबांदोडा पंचायतीमधून 45, मोलेतून 27 तर कुळे, शिगावमधून 289 मतांची आघाडी घेतली. केवळ साकोर्डा पंचायतीमध्ये मगो उमेदवाराने 67 मतांची आघाडी मिळावली.
सावर्डे मतदारसंघातून भाजपाच्या सुवर्णा तेंडुलकर यांनी सलग दुसऱयांदा विजय मिळविला आहे. त्या विद्यमान जि. पं. सदस्य आहेत. त्यांना 4888 तर प्रतिस्पर्धी मगोचे प्रदीप देसाई यांना 3153 मते मिळाली. काँग्रेसचे शाम भंडारी यांना 802, आपचे सिद्धार्थ पाटील यांना 343 तर अपक्ष उमेदवार राहुल शेटवी यांना 102 मते मिळाली. सावर्डे मतदारसंघात भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यामध्ये स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचा वाटा मोठा आहे. या विजयाचे श्रेय मतदाराबरोबरच तमाम भाजप कार्यकर्ते, मंडळ सदस्य व पंचायत सदस्यांना त्यांनी दिले आहे. मागच्यावेळी भाजपाचे धारबांदोडय़ातील जि. पं. सदस्य गोविंद गावकर व सुवर्णा तेंडुलकर यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. यापुढेही अधिक वेगाने विकासकामे होतील अशी प्रतिक्रीया यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. पर्यटन, शेती या व्यवसायांना चालना देतानाच खाणउद्योग सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्यादृष्टीने तमनार वीजप्रकल्प , रेल्वे दुपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुधा गावकर यांनी आपल्या यशाचे श्रेय मंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजप मंडळ व पंचसदस्यांना दिले आहे. विद्यमान जि. पं. सदस्य गोविंद गावकर यांनी ज्या प्रमाणे या भागाचा विकास केला, त्याचप्रकारे विकासकामे होतील असे त्या म्हणाल्या. सुवर्णा तेंडुलकर यांनीही या विजयाचे श्रेय मंत्री पाऊसकर यांच्यासह माजी आमदार गणेश गावकर, नरेंद्र सावईकर, पक्ष कार्यकर्ते व पंचसदस्यांना दिले आहे.