ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता डेल्टाचा धोका वाढताना दिसत आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, डेल्टा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये 30 जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला असून या मधील 28 रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी सांगितले की, हे 30 रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील 135 देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या 20 कोटी पार करेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच सांगितले आहे.
कोरोना विषाणूपेक्षा घातक असलेला ‘डेल्टा’ चा अमेरिका, चीनसह 132 देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे कोरोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.