सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई : सर्वाधिक दंड वसुली
सावंतवाडी:
सावंतवाडी पोलिसांनी गेल्या सात महिन्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱया व कोरोना संसर्ग कालावधीत तोंडाला मास्क न लावणाऱयांवर धडक कारवाई करत सुमारे नऊ लाखांहून अधिक दंडात्मक कारवाई केली. जिल्हय़ात सावंतवाडी विभागातही सावंतवाडी पोलिसांची कारवाई मोठी आहे. तर जिल्हा वाहतूक शाखेने सुमारे 33 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी अभिनंदन केले.
जानेवारी ते जुलै 2021 या सात महिन्यात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, सखाराम भोई, सुनील नाईक व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱयांनी एकत्रित धडक कारवाई राबविली. वाहन चालविण्याचे नियम तोडणाऱया 2 हजार 231 चालकांवर कारवाई करण्यात आली. यात विनापरवाना 219 वाहनचालकांवर कारवाई करून 1 लाख 09 हजार 500 रुपये दंड, वाहन चालविताना परवाना सोबत नाही, अशा 832 चालकांवर कारवाई करत 1 लाख 66 हजार 600 रुपये दंड, दुचाकीवर ट्रिपल सीट वाहतूक करणाऱया 87 जणांवर कारवाई करत 17 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला.
नो पार्किंगमध्ये वाहन लावलेल्या 388 चालकांवर कारवाई करत 79 हजार 600 रुपये दंड, सीटबेल्ट न लावणे अशा 123 वाहन चालकांवर कारवाई करत 24 हजार 600 रुपये दंड, हेल्मेट नाही, कारच्या काळय़ा काचा लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणाऱया 41 वाहन चालकांवर कारवाई करत 8 हजार 200 रुपये, इशारा देऊनही वाहन न थांबविणाऱया 141 वाहन चालकाना 28 हजार 200 रुपये असे नियम तोडणाऱया 335 वाहन चालकांवर कारवाई करत 66 हजार शंभर रुपये दंड वसूल केला. एकूण 2 हजार 231 केसीस करून 5 लाख 19 हजार रुपये दंड करण्यात आला.
विनामास्ककडून 3 लाख दंड वसूल
गेल्या सात महिन्यात तोंडाला मास्क न वापरता फिरणाऱया 147 व्यक्तींवर कारवाई करून 3 लाख 2 हजार 300 रुपये दंड करण्यात आला. कोरोना काळात 209 जणांवर भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले होते. त्यातील 117 गुन्हे न्यायालयात शाबित होऊन 1 लाख 19 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
सावंतवाडी वाहतूक पोलिसांनी शहराबरोबरच आंबोली, सातार्डा व आरोंदा येथेही कारवाई केली. या कारवाईत तत्कालीन पोलीस अधिकारी शशिकांत खोत, पोलीस अधिकारी वर्ग, पोलीस कर्मचारी महेश जाधव, प्रसाद कदम, शरद लोहकरे, मनोज राऊत, दर्शन सावंत, दत्ता देसाई, बाबू तेली, गुरू नाईक, गुरू भागवत, विजय केरकर, डुमिंग डिसोजा आदींनी भाग घेतला होता.
जिल्हा वाहतूक शाखेकडून 33 लाखांचा दंड वसूल
जिल्हा वाहतूक शाखेने 13 हजार 266 वाहनांवर कारवाई करत 33 लाख 56 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. सावंतवाडी विभागाने 7 हजार 481 केसीस करून 18 लाख 69 हजार रुपये दंड वसूल केला. तर कणकवली विभागाने 5 हजार 942 केसीस करून 16 लाख 4 हजार रुपये दंड वसूल केला. जिल्हय़ात एकूण 27 हजार 592 वाहनचालकांवर कारवाई करून एकूण 70 लाख 64 हजार 600 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.