ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमधील डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात नक्षलवाद्यांनी एकाच घरातील चौघांना घराबाहेर फासावर लटकवून त्यांची हत्या केली. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचे घर बॉम्बने उडवून दिले. तसेच घराबाहेर असलेली दुचाकी जाळून टाकली. शनिवारी रात्री ही घटना घडली.
सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह अशी हत्या झालेल्या नागरिकांची नावे आहेत. या चौघांच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी तेथे एक पत्रक लावले. हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय यांच्या नावाने लावण्यात आले आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, मानवतेची हत्या करणारे आणि विश्वासघात करणाऱयांना मृत्यूदंडाशिवाय पर्याय नाही. हा अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या चार सहकाऱयांच्या हत्येचा बदला आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांच्याकडून या भागात शोधमोहिम सुरू आहे.