लेडी सुपरस्टार नयनतारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एका मागोमाग एक चित्रपट स्वीकारत आहे. पुढील काही वर्षांसाठी ती अत्यंत बिझी राहणार आहे. आता तिने अभिनय तसेच निर्मितीसह उद्योगक्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटविण्याची योजना आखली आहे. अलिकडेच तिने स्वतःचा भावी पती विग्नेश शिवनसोबत व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. दोघांनीही एका ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. याचबरोबर अभिनेत्रीने एक कंपनी सुरू केली आहे.

नयनताराने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या नव्या बिझनेस पार्टनरसोबतचे छायाचित्र शेअर करत नव्या कंपनीची माहिती दिली आहे. त्वचातज्ञ रेनिता राजन यांच्यासोबत भागीदारी करत ब्युटी रिटेल ब्रँड द लिप नावाची कंपनी सुरू केली आहे.
अभिनेत्री स्वतःच्या भावी पतीसोबत मिळून राउडी पिक्चर्स प्रॉडक्शन हाउसही चालवत आहे. सध्या या बॅनर अंतर्गत ‘कूझंगल’ चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. याचे दिग्दर्शन विनोद राज करत आहेत. यापूर्वी नयनताराने रजनीकांत यांच्या घरानजीक एक नवे घर खरेदी केले होते. नयनतारा सध्या चिरंजीवी यांच्यासोबत ‘गॉडफादर’ चित्रपटात काम करत आहे.