पुणे \ ऑनलाईन टीम
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला रूपाली चाकणकर यांनी दिला आहे.
रूपाली चाकणकर यांनी ट्वीटर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल देण्यात आला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावती जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना दिला आहे.
पडद्याआड राजकीय खिचडी शिजली असल्याची शंका -नवनीत राणा
नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निकालावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा जात आरक्षण प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. माझा कोणावरही आरोप नाही. पण ज्या पद्धतीने न्यायालयाचा अचानकपणे निकाल येतो त्यानुसार काही तरी नक्कीच पडद्याआड राजकीय खिचडी शिजत असल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच न्यायालयाने जी मुदत दिली आहे त्या मुदतीत पुढचं कायदेशीर पाऊल उचलणार, असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.