टाइम्स स्क्वेअरवर लोकांशिवाय बॉल ड्रॉप सोहळा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दुबईत बुर्ज खलिफा, न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर आणि सिडनीत हार्बर ब्रिज येथील आतिषबाजी जगात चर्चेत राहत असली तरीही यंदा अनेक शहरांमध्ये नववर्षाच्या जल्लोषाला मज्जाव करण्यात आला आहे. सिंगापूर, मॉस्को, पॅरिस, बर्लिन आणि लंडन यासारख्या शहरांमध्येही नववर्षाचे सोहळे रद्द झाले.
2021 हे वर्ष कोरोनाच्या दहशतीदरम्यान अनेक अपेक्षा घेऊन येत आहे. अनेक देशांमध्ये बंधनांसह जल्लोष करण्यात येत आहे. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियानजीक टोंगा बेटावर नव्यावर्षाचा सूर्य उगवला असून बेकर बेटावर सर्वात अखेरीस सूर्यकिरणे पोहोचणार आहेत.
दुबईत बुर्ज खलिफा
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुर्ज खलिफावर आतिषबाजी, रोषणाई आणि लेझर शो पार पडला आहे. लोकांना या भागात तयार करण्यात आलेल्या 5 प्रवेशद्वारांवरून क्यूआर कोड दाखवून प्रवेश मिळाला आहे. तेथे कोरोनासंबंधीचे दिशानिर्देश कठोरपणे लागू करण्यात आले आहेत. सोहळय़ाचे थेट प्रसारण करण्यात आले होते.
सिडनीचे हार्बर ब्रिज
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील आतिषबाजी जगभरात प्रसिद्ध आहे. नव्यावर्षाचा जल्लोष सर्वप्रथम साजरा करणारे हे जगातील पहिले शहर आहे. 31 डिसेंबरच्या दुपारपासून सिडनीच्या हार्बर ब्रिजनवर फेरी रेस, सांगितिक सोहळे आणि सैन्य प्रदर्शनांचे कार्यक्रम पार पडले आहेत. परंतु कोरोनामुळे तेथे लोकांच्या एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
न्यूयॉर्कचे टाइम्स स्क्वेअर
24 तास प्रकाशाने उजळणाऱया न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर दरवर्षीप्रमाणे गर्दी नव्हती. न्यूयॉर्कच्या पोलिसांनी टाइम्स स्क्वेअरवर सर्वसामान्यांना जाण्यापासून रोखले आहे. सर्वप्रथम तेथे 1907 मध्ये बॉल ड्रॉप करण्यात आला होता. 18 व्या शतकात बंदरांवर दरदिनी एका निश्चित वेळी अशाप्रकारेच बॉल ड्रॉप केला जायचा. बॉल ड्रॉपमुळे खलाशांना संकेत मिळायचा आणि ते स्वतःच्या घडय़ाळातील वेळ जुळवून घ्यायचे. जल्लोषाचे हे स्वरुप न्यूयॉर्क टाइम्सचे मालक आल्प्रेड ऑक्स यांनी सादर केले होते. वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी तयार करण्यात आलेल्या लाकडी तसेच लोखंडी बॉलचे वजन 317 किलो होते. तेव्हापासून दरवर्षी टाइम्स स्क्वेअर बॉल ड्रॉप करण्याची परंपरा आहे. युद्धामुळे हा बॉल 1942 आणि 1943 मध्ये पाडविण्यात आला नव्हता.