लोकशाहीत आपल्याला अधिकार मिळतात परंतु आपण हे विसरतो की अधिकारांसोबत कर्तव्येही येतात. आपण आपली कर्तव्यं विसरतो आणि केवळ अधिकारांसाठी आंदोलन करतो. भारत स्वच्छ करण्यासाठी आपण लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, केवळ सरकारच हे करू शकत नाही. अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी एकत्रितपणे काम करतात.
आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यासाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो. म्हणजे सामूहिक कृतींद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यामध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाली मृत्यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा वा पूरक उद्दिष्ट असते.

सार्वजनिक स्वच्छता
सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱया यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमुळे समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या कामाला मदत होते.
आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत आणि आपली जीवनशैलीही बदलून जाते. स्वच्छ परिसरात लोक मॉर्निंग वॉल्क किंवा जॉगिंगला जास्त जाताना दिसतात. अशा चांगल्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो. स्वच्छ पटांगणात मुले खेळतात, आपले व्हिडिओ गेम, मोबाईल दूर करून मैदानात येतात, ऍक्टिव्ह होतात. याचा फायदा असा होतो की मुलांचा अभ्यासाचा ताण कमी होतो ती खूष राहू लागतात.
आपल्याला हे सगळे माहीत आहे पण तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले परिसर दुसऱयांचा या विचाराने आपल्या भारताचा ऱहास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही. हां त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्याच पाहिजेत. पण जोपर्यंत आपण स्वच्छताप्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्त्व, फायदे जाणून घेत नाही तोपर्यंत काहीही बदल होणार नाही.
जर आपल्याला स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मध्ये भाग घ्यावा लागेल. अशा मोहिमेला साथ दिला पाहिजे.
निष्कर्ष आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. इथे लोकांना बदलायची गरज आहे हे फक्त एकटय़ा सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत मोहिमेची सुरूवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली. परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे. आम जनता त्यांची साथ सोडत आहे. अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे. नाही तर ते यशस्वी होणार नाही. सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.