परशराम शिसोदे/ संकेश्वर
अनेक वर्षांपासूनची मागणी असलेले संकेश्वरातील हायटेक बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे दोन वर्षे ऊन, पावसाचा मारा सहन करत बसची प्रतीक्षा करणाऱया प्रवाशांना नव्या वर्षात हायटेक बसस्थानकातून बससुविधेचा लाभ मिळणार आहे. 24 तास पाणी योजना, भुयारी गटार निर्मिती, यानंतर आता हायटेक बसस्थानक निर्मितीमुळे संकेश्वरातील नागरिकांबरोबरच प्रवासी वर्गाची मोठी सोय होणार आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांना जोडणारे शहर म्हणून संकेश्वर शहर ओळखले जाते. यामुळे येथून आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. तसेच निपाणी, हुक्केरी, गडहिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर या मार्गावर दररोज हजारो प्रवासी येथून ये-जा करत असतात. मात्र येथील बसस्थानकाची असलेली इमारत जीर्ण झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळय़ात तर बसस्थानकाच्या इमारतीमध्येच गळतीच्या माध्यमातून तलावसदृश्य स्थिती निर्माण होत होती.
या सर्व अडचणींचा विचार करून आमदार उमेश कत्ती यांच्या प्रयत्नाने दोन वर्षापूर्वी संकेश्वरात हायटेक बसस्थानक निर्मितीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यातून सध्या 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या बसस्थानकात दर्जेदार आसनव्यवस्था, हायटेक शौचालय, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह, कॅन्टीन आदी सुविधा हायटेक स्वरुपात प्रवाशांना मिळणार आहेत. या बसस्थानकामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याने प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
गेली दोन वर्षे बसस्थानकाचे काम सुरू असल्याने बसस्थानकाबाहेरील चन्नम्मा सर्कलमधून बससेवा सुरू होती. मात्र येथे निवाराशेडची व्यवस्थाच नसल्याने पावसाळय़ामध्ये प्रवाशांची मोठी तारांबळ उडत होती. ऊन, पावसापासून बचावासाठी प्रवाशांना नजीकच्या दुकानांच्या शेडचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे बसस्थानकाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी होत होती. अखेर दोन वर्षानंतर बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले असून प्रवाशांना नव्या वर्षात हायटेक बसस्थानकातून बससुविधेचा लाभ मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार बसस्थानक निर्मिती
यासंदर्भात बोलताना आमदार उमेश कत्ती यांनी, संकेश्वर शहर व परिसराच्या विकासासाठी गेल्या 10 वर्षात 500 कोटीहून अधिक विकासकामे राबवली आहेत. यामध्ये भुयारी गटार निर्मिती, 24 तास पाणी योजना, तलाव भरणी, 33 बेडचे अत्याधुनिक आरोग्य केंद्र, संपर्क रस्ते निर्मिती यासह विविध कामांचा समावेश आहे. संकेश्वर शहर हे सीमाभागातील प्रमुख शहर असल्याने येथे हायटेक बसस्थानकाची मागणी प्रवाशांतून होत होती. त्यानुसार बसस्थानक निर्मिती करण्यात आली आहे. एक-दोन महिन्यात बसस्थानकाचे उद्घाटन होऊन प्रवाशांची सोय होईल, असे सांगितले.