लंडन / वृत्तसंस्था
ग्लोसेस्टरशायर संघाने पाकिस्तानी मध्यमगती गोलंदाज नसीम शाहला करारबद्ध केले असल्याची माहिती बुधवारी दिली. 18 वर्षीय नसीम शाह 2022 च्या हंगामात ग्लोसेस्टरशायर संघातर्फे सर्व क्रिकेट प्रकारात सहभागासाठी उपलब्ध असेल. या कालावधीत पाकिस्तान संघाच्या आवश्यकतेनुसार व निवडीनुसार नसीमला कौंटी क्रिकेटमधून सवलत दिली जाणार आहे. उदयोन्मुख खेळाडू म्हणून उदयास आलेल्या नसीमने पाकिस्तानतर्फे 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 मध्ये सोळाव्या वर्षी कसोटी पदार्पण नोंदवले. त्या लढतीत त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद करण्याचा पराक्रम गाजवला होता. पदार्पणानंतर एका महिन्याच्या आतच त्याने कसोटीत एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. लंकेविरुद्ध त्याने 31 धावात 5 बळी, असे सर्वोत्तम पृथक्करण नोंदवले.