उत्तम दिवसे यांचे उपोषण ३१ ऑगस्टपर्यंत मागे
वाकरे/प्रतिनिधी
नागदेववाडी (ता. करवीर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील आर्थिक भ्रष्टाचाराची व सचिवपदाची चुकीच्या पद्धतीने नेमणूक केल्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर आयोजित केलेले बेमुदत उपोषण करवीर पं.स. व जिल्हा परिषदेच्या मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाशी निगडीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दि.३१ ऑगस्टपर्यंत चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिल्याने मागे घेतल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उत्तम सर्जेराव दिवसे यांनी दिली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की नागदेववाडी (ता. करवीर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील आर्थिक भ्रष्टाचाराची व सचिवपदाची नेमणूक चुकीच्या पद्धतीने केल्याबद्दल चौकशी करण्याबाबत उत्तम दिवसे यांनी दिनांक ३ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते.त्यांनी दिलेल्या आदेशानुसार १५ जुलै रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे व करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून योजनेची सविस्तर माहिती घेऊन या योजनेतील त्रुटी लेखी स्वरूपात देणेस सांगितले होते. त्याप्रमाणे दिनांक १७ जुलै रोजी राष्ट्रीय पेयजल योजनेतील अपुऱ्या कामाचे सात मुद्दे लेखी स्वरुपात कळवले होते. मात्र आतापर्यंत सदर पेयजल योजनेतील त्रुटी दुरुस्त झालेल्या नाहीत. सदरच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला असून पंधरा दिवसात चौकशी तसेच योजनेतील त्रुटी दुरुस्त न केल्यास दिनांक २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा श्री. दिवसे यांनी दिला होता.
दरम्यान मंगळवारी सकाळी करवीर पंचायत समितीने या योजनेची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.मोरे यांनी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संबंधित प्रकरणाशी निगडित असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चौकशी समिती नेमण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. करवीर पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याबाबत संबंधितांकडे कार्यवाही होणेबाबत पत्र दिल्याने तसेच संचारबंदी आदेश असल्याने हे उपोषण मागे घेतल्याची माहिती श्री दिवसे यांनी दिली आहे.