नागपूर : ऑनलाईन टीम
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. मात्र नागपुरात गुरुवार सकाळपासून ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच 19 मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट आणि विजेची शक्यता वर्तविली आहे. या वादळाचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास असेल, असे म्हटले आहे.
नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही या दिवशी इशारा देण्यात आला आहे. तर 20 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.