वार्ताहर / मडकई
लॉकडाऊनच्या काळात बांदोडा पंचायत क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांना मदत म्हणून नागेशी संस्थानने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करुन आपली सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी देवस्थान समितीचे अभिनंदन केले. कडधान्याअभावी गैरसोय होत आहे.
नागेश संस्थानतर्फे पुरविण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्यामसुंदर कामत, खजिनदार वामन कामत, मुख्यत्यार देवेंद्र सरदेसाई, बांदोडाचे सरपंच रामचंद्र नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य वामन नाईक, कविता नाईक तसेच संस्थानचे संबंधित सेवेकरी उपस्थित होते.
अशा आपत्कालीनवेळी बांदोडय़ातील श्री नागेश, श्री महालक्ष्मी व श्री रामनाथ संस्थानने तसेच अंत्रुज महालातील अन्य देवस्थानांनी कडधान्य वितरणाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे आमदार श्री. ढवळीकर म्हणाले. अशा प्रकारचे कार्य देवस्थानांबरोबर अन्य सामाजिक संस्थांनी सुरु करुन सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. माधवराव ढवळीकर टॅस्ट्रतर्फे मडकई मतदार संघाबरोबर अन्य भागात सात हजार कुटूंबाना व अन्य संस्थाना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. ढवळीकर ट्रस्टकडून नागरिकांची गरज ओळखून यापुढेही अशी मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले.
श्यामसुंदर कामत यांनी संस्थानच्या कार्याची माहिती देऊन या संकटकाळी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी तसेच कोरानापासून समस्त मानवजातीचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना केली.