चार एकांकिकांचे सादरीकरण : ‘तुझं माझं जमेना’ या एकांकिकेने प्रेक्षकांना पोटधरून हसविले
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव थिएटर असोसिएशनचा नववा नाटय़ महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी बेळगावच्या नाटय़ रसिकांनी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद दिला. या महोत्सवामध्ये चार एकांकिका सादर करण्यात आल्या. नाटय़ महोत्सवाची सुरुवात कै. अशोक याळगी यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी नाटय़ रसिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
प्रारंभी प्रशांत मणगुतकर यांनी असोसिएशनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. महोत्सवाची सुरुवात रविंद्र वाडकर लिखित धांडोळा एकांकिकेने झाली. या एकांकिकेचे दिग्दर्शन अपेक्षा बिर्जे यांनी केले होते. नवऱयाच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडलेल्या एका स्त्रीची व्यथा पत्रकाराच्या लेखणीतून मांडण्यात आली. ‘तुझं माझं जमेना’ या एकांकिकेने प्रेक्षकांना पोटधरून हसविले. नवरा-बायकोच्या भांडणातील प्रेम दर्शविणारी एकांकिका भैरव भातकांडे यांनी दिग्दर्शित केली होती.
मैत्रित लपलेलं पहिलं गुलाबी प्रेम व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका खेळाच्या निमित्ताने खुलत जाते. ऋषिकेश तुराई लिखित व सुजित बिर्जे दिग्दर्शित या एकांकिकेने रसिकांना खिळवून ठेवले. विजय तेंडोलकर लिखित मादी या एकांकिकेचे दिग्दर्शन सुजित बिर्जे यांनी केले होते. चारही एकांकिकांचे नेपथ्य संकेत लोहार, राजू लोहार यांनी केले. संगीत संयोजन सचिन मांडेकर व प्रज्ञा शिवणगेकर यांनी केले. कपिल राजगोळकर व विनायक बलोगी यांनी प्रकाश योजना केली.