ख्रिसमस ट्रीसह लायटिंगच्या माळा, कँडल, विविध शोभेच्या वस्तू बाजारात उपलब्ध : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून होतेय साहित्याची खरेदी

प्रतिनिधी /बेळगाव
नाताळ हा सण अवघ्या चार दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठ साहित्याने सजली आहे. ख्रिसमस ट्री, ख्रिस्त जन्माचे देखावे, मुखवटे, सांताक्लॉजच्या टोप्या यासह इतर शोभिवंत साहित्य सर्वत्र विक्रीसाठी दिसून येत आहे. साहित्य दाखल झाले असले तरी अद्याप ग्राहक नसल्याने विपेत्यांना ग्राहकांची वाट पहावी लागत आहे. बुधवारपासून खरेदीचा उत्साह वाढेल असा अंदाजही व्यापारी व्यक्त करीत आहेत
वर्षाच्या सरतेवेळी आनंद देणारा व चिमुकल्यांच्या चेहऱयावर हास्य फुलविणारा सण येतो तो नाताळाचा. केवळ ख्रिश्चन धर्मियच नव्हे तर इतर धर्मियही उत्साहात हा सण साजरा करतात. नाताळच्या खरेदीसाठी आठवडापूर्वीपासूनच खरेदी केली जात असते. लायटिंगच्या माळा, कँडल, विविध शोभेच्या वस्तू, गिफ्ट देण्यासाठी विविध साहित्य आदीने बाजारपेठ फुलते. बेळगावमध्ये पांगुळगल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, मारूती गल्ली या परिसरात अनेक विक्रेत्यांनी नाताळाला लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सर्रास नाताळ साजरा केला जात असल्याने सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी विद्यार्थी व त्यांचे पालक जमा होत आहेत.
यावषी ख्रिसमस ट्री च्या दरात चार पटीने वाढ झाली आहे. 400 रुपयांपासून पुढे ख्रिसमस ट्री उपलब्ध आहेत. यासोबत ख्रिसमसचे हेअर बँड, बॉल, आकाश कंदील, गारलँड, विद्युत माळा, घंटा, काचेच्या बरण्या असे साहित्य 20 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. ग्रीटींगकार्ड 15 रुपयांपासून, कॅन्डल 150 रुपयांपासून पुढे तर ख्रिसमस कॅप 40 रुपयांपासून उपलब्ध असल्याचे विपेत्यांनी सांगितले.
बेळगावला वेठीस धरल्याने बाजारपेठेला फटका
केवळ आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी अधिवेशन भरविले जात आहे. परंतु यामुळे आठवडय़ाभरात घडलेल्या घटना व त्याचे उमटलेले पडसाद याचा परिणाम बेळगावच्या व्यापाऱयावर झाला. नाताळपूर्वीच्या विकेंडला मोठय़ा प्रमाणात गोवेकर बेळगावमध्ये येतात. परंतु यावेळी मात्र घडलेल्या घटनांमुळे गोवेकरांनी न येणेच पसंत केले. याचा परिणाम व्यापार पूर्णपणे मंदावला असून, शेजारील हुबळी बाजारपेठेला गोवेकर प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आवर घालून सुरळीत व्यापार सुरू करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
आता ग्राहकांच्या प्रतीक्षेत
नाताळ अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला असला तरी अद्याप म्हणावी तशी खरेदीला सुरूवात झालेली नाही. यावषी चीनमधून आयात बंद असल्यामुळे काही शोभेच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. नाताळसाठी बाजारपेठ सजली असून, आता ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे गजानन कावळे यांनी सांगितले.
– गजानन कावळे (विक्रते)
नाताळसाठी सर्व साहित्य दाखल
दरवषी नाताळच्या खरेदीसाठी गोवेकर मोठय़ा संख्येने बेळगावमध्ये येतात. परंतु यावेळी मात्र बेळगावमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे विक्री पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवरच आता अवलंबून रहावे लागणार आहे. नाताळसाठी मेणबत्त्या, कँडल, कँडलस्टॅंड, ग्रीटींगकार्ड, कॅप यासह इतर साहित्य दाखल झाले असल्याची माहिती संतोष सांबरेकर यांनी दिली.
– संतोष सांबरेकर (विक्रते)