कोरोनाची भीती असूनही उत्साही वातावरण : पणजीसह राज्यातील सर्व बाजारपेठा गजबजल्या
प्रतिनिधी / पणजी
कोरोना भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाताळ उत्साहात साजरा करण्यासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत. नाताळ हा गोमंतकीयांचा एक महत्वाचा सण आहे. आनंद आणि हर्षोल्हासाचा सण आहे. यामुळे संपूर्ण राज्याला जिंगलबेलच्या धूनमध्ये उत्सवी स्वरूप आले आहे. जातीभेद,आणि कुठल्याही प्रकारचे किल्मीष मनात न ठेवता या उत्सवाचे स्वागत केले जाते. खरा उत्सवी रंग येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर संपूर्ण गोव्याला चढतो.
ख्रिस्तिधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा होणाऱया नाताळ सणाचे आणखी खास आकर्षण म्हणजे येशू जन्म सोहळय़ाचे साकारण्यात येणारे देखावे.
येशू ख्रिस्त जन्मसोहळा आकर्षण
येशू ख्रिस्तचा जन्म गोठय़ात झाला असल्यामुळे या आधारावर घराच्या अंगणात गोठा तयार करून त्यात सुंदर देखावे साकारले जातात. त्या गोठय़ाला रोषणाईने सजविले जाते. या देखाव्यातून येशूंचे संपूर्ण गाव चित्रित केले जाते. जे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. याचबरोबर ख्रिसमस ट्रीचीही सजावट केली जाते. चॉकलेट केक, दोदोल, बेबिन्का यासारख्या विविध प्रकारचे गोडधोड खाद्यपदार्थ केले जातात.
मागील चार दिवसांपासून नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी राज्यातील सर्व बाजारपेठा खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजल्या होत्या. बाजारात सांताक्लॉजच्या टोप्या, सजावटीच्या वस्तू तसेच ख्रिसमस ट्री मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. कोरोना विषाणूची भीती असूनही नाताळ सणावर विरजण पडू न देण्याचा उत्साह गोमंतकीयांमध्ये दिसून आला.