ही प्रेरणादायी कहाणी जिसतू कपूर या प्रयत्नवादी तंत्रज्ञाची आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे चाळीस वर्षं नापिक अवस्थेत पडलेल्या भूमीत त्यांनी सफरचंदाची लागवड करुन ती यशस्वी करुन दाखविली आहे. त्यांनी या यशासाठी चारच महिने प्रयत्न केले. पण ते अतियश शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि मन लावून केले. सहसा अशा नापीक आणि पडीक भूमीत फळांची बाग करणं अशक्य असतं. पण त्यांनी त्यासाठी काहीसं निराळं तंत्र उपयोगात आणून यश प्राप्त केलं.

त्यांनी या भूमीत उगवू शकतील अशा डार्क बॅनर गाला आणि मॅमा गाला जातीच्या सफरचंदांची लागवड केली. डिसेंबरात त्यांनी लागवड केली त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश मिळेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. पुष्कळ प्रयोग करावे लागतील असं त्यांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही.
सफरचंदांची रोपं लावल्यानंतर त्यांची झाडं होऊन फळं यायला बराच कालावधी जावा लागतो. पण कपूर यांनी केलेल्या प्रयोगामुळं हा कालावधी काही वर्षांवरुन काही महिन्यांवर आला आहे. सफरचंदांची ही जात इटली या देशात विकसीत करण्यात आली होती. नंतर ती भारतात आली. आता कपूर यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानं फळ बागायत क्षेत्रात स्वारस्य असणाऱया तरुणांना आकर्षक कमाईचं एक नवं दालन खुलं झालं आहे. कपूर यांचं पहिलंच पीक 230 रुपये किलो या भावानं विकलं गेल्याचा दावा कपूर करतात. त्यांचा हा प्रयोग खरंच प्रेरणादायी आहे, असे अनेक तज्ञांचंही मत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.