विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी पहिला दिवस : यंग, मिशेल, वॅटलिंगचे उपयुक्त योगदान
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
शुक्रवारपासून विंडीजविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी हेन्री निकोल्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने 6 बाद 294 धावा जमविल्या. दिवसअखेर निकोल्स 117 धावांवर खेळत होता.
पावसाळी हवामानामुळे बेसिन रिझर्व्हवरील सामना कठीण जाणार याची जाणीव दोन्ही संघांना होती. गोलंदाजीस अनुकूल असणाऱया खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जात होते. प्रत्येक फलंदाज धावासाठी झगडत होता. अशा स्थितीत निकोल्सने संघर्षपूर्ण शतक झळकावत आपल्या संघाला सुस्थितीत आणले. त्याचे हे सहावे कसोटी शतक आहे. वेलिंग्टनमध्ये अनेक दिवस पाऊस झाल्याने खेळपट्टी झाकण्यात आली होती. मुख्य खेळपट्टीवर हिरवळ असली तरी त्याखालील भाग टणक होता. त्यामुळे नाणेफेक हरणारा संघ फलंदाजीस येणार हे निश्चित होते. कारण अशा खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण असते. विंडीजचा कर्णधार होल्डरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि शॅनन गॅब्रियलच्या नेतृत्वाखालील माऱयापुढे उपाहारापर्यंत न्यूझीलंडचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
नंतर वातावरणात थोडा बदल झाला आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात फलंदाजी करणे थोडेफार सोपे झाले. शेवटच्या काही षटकात तर विंडीजने रॉस्टन चेसचा फिरकी माराही सुरू केला. एका बाजूने गडी बाद होत असताना निकोल्सने मात्र संघर्षमय खेळ करीत शतकापर्यंत झेप घेतली. विंडीजच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही त्याला लाभ झाला. त्याला किमान तीन जीवदाने मिळाली. याच बळावर निकोल्सने 14 कसोटी डावानंतर पहिले अर्धशतक व नंतर शतक नोंदवण्यात यश मिळविले. 47 धावांवर स्लिपमधील डॅरेन बॅव्होने त्याला जीवदान दिले आणि याच धावसंख्येवर चेमार होल्डरने त्याचा आणखी एक झेल सोडल्यानंतर गोलंदाज गॅब्रियल बराच निराश झाला होता. पण नंतर दुसऱया सत्रात कर्णधार होल्डरने दुसऱया स्लिपमध्ये विल यंगचा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. यंगने 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. गॅब्रियलची ही 50 वी कसोटी असून यंगला बाद करीत त्याने 150 व्या बळीची नोंदही केली. त्याआधी पहिल्या सत्रात गॅब्रियलने टॉम ब्लंडेल (14) व रॉस टेलर (9) यांनाही बाद केले होते. चेमार होल्डरने आपला पहिला बळी मिळविताना न्यूझीलंडचा हंगामी कर्णधार टॉम लॅथमला पदार्पण करणारा यष्टिरक्षक जोशुआ दा सिल्वाकरवी झेलबाद केले. लॅथमने 4 चौकारांसह 27 धावा काढल्या.
जखमी शेन डॉरिचच्या जागी दा सिल्वाला विंडीजने अंतिम संघात स्थान दिले तर केमार रोशच्या जागी चेमार होल्डरला संधी दिली. पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असल्याने नियमित कर्णधार केन विल्यम्सनने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे लॅथम संघाचे नेतृत्व करीत आहे. विल्यम्सनच्या गैरहजेरीत त्यांच्या फलंदाजी लाईनअपमध्ये थोडी पोकळी असल्यासारखे वाटत होते. पण निकोल्सने ती भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हिरवळयुक्त खेळपट्टीवर दीर्घ काळ टिकून राहण्याचे कसब न्यूझीलंड फलंदाजांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे नवोदित यंग म्हणाला. सकाळच्या सत्रात न्यूझीलंडने 3 गडी गमविले पण नंतर दुसऱया सत्रात एक व तिसऱया सत्रात 2 बळी गमविले. निकोल्सने यंगसमवेत 70, बीजे वॅटलिंगसमवेत 55 आणि डॅरील मिशेलसमवेत 83 धावांची भागीदारी करीत संघाला मजबूत स्थितीत आणले. गॅब्रियलने 3 तर चेमार होल्डरने 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 84 षटकांत 6 बाद 294 : लॅथम 27 (53 चेंडूत 4 चौकार), ब्लंडेल 14 (19 चेंडूत 2 चौकार), यंग 43 (87 चेंडूत 4 चौकार), टेलर 9 (12 चेंडूत 1 चौकार), हेन्री निकोल्स खेळत आहे 117 (207 चेंडूत 15 चौकार, 1 षटकार), वॅटलिंग 30 (51 चेंडूत 6 चौकार), मिशेल 42 (68 चेंडूत 5 चौकार), जेमीसन खेळत आहे 1, अवांतर 11. गोलंदाजी : गॅब्रियल 3-57, चेमार होल्डर 2-65, अल्झारी जोसेफ 1-65, जेसॉन होल्डर 0-62, चेस 0-37.