भाजपकडून घोषणा : लोक जनशक्ती पक्षाचीही साथ
नवी दिल्ली, पटना / वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भाजपने आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने कोरोनातील आचारसंहिता जाहीर केल्यामुळे लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने राज्य पातळीवर बैठकींना सुरुवात केली असून संजद आणि लोक जनशक्ती पक्षासोबत राहण्यावर रविवारी शिक्कामोर्तब केले. तसेच संजदचे नेते नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालीच बिहारमधील निवडणुका लढवण्याचेही स्पष्ट केले.
भाजप प्रदेश कार्यसमितीची रविवारी व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नड्डा यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जेडीयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे. आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार व विजयी होणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.
विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा!
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच छोटय़ा-छोटय़ा बैठका आयोजित करून प्रचार सुरू करण्याचेही आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती घरोघरी पोहोचवा, अशी सूचनाही त्यांनी केली. बिहारसह देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून या निवडणुकीत भाजप-संजद आघाडीच मोठा करिष्मा करेल, असेही ते म्हणाले.