प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी व चिकोडी तालुके व रायबाग तालुक्याचा काही भाग असे कार्यक्षेत्र असलेल्या निपाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी संपत आहे. त्यामुळे 29 जून रोजी नूतन पदाधिकारी निवड होणार आहे. यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जाहीर केला आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी हा 20 महिन्यांचा असतो. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतरातून भाजपची सत्ता आली. त्यामुळे येथील एपीएमसीमधील काँग्रेसच्या शासननियुक्त संचालकांना पदच्युत व्हावे लागले. परिणामी एपीएमसीमध्ये काँग्रेस अल्पमतात आल्याने अध्यक्ष सुभाष पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्याजागी अध्यक्ष म्हणून भाजपचे अमित साळवे यांची ऑक्टोंबर 2019 मध्ये निवड झाली होती. मात्र व्यक्तीपेक्षा पदाचा कार्यकाळ गृहीत धरला जात असल्याने 20 महिने पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.
त्यानुसार नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी 29 जून रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. यादिवशी सकाळी 11 ते 12 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दुपारी 12 ते 12.15 यावेळेत अर्ज छाननी व 12.15 ते 12.30 या वेळेत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
यावेळी एकहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास 12.30 वाजता मतदान प्रक्रिया होणार आहे. अन्यथा 12.30 वाजताच नूतन पदाधिकारी निवड जाहीर केली जाणार आहे. सध्या एपीएमसीवर भाजपची सत्ता आहे. सध्या राज्यातही भाजपचे सरकार असल्याने पुरेसे संख्याबळ व शासननियुक्त संचालक या जोरावर पुन्हा भाजपची सत्ता निश्चित असली तरी पदाधिकारी म्हणून कोणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता आहे.