ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचा धोका वाढला आहे. केरळच्या कोझिकोड जिह्यात निपाह व्हायरसची लागण झाल्याने एका 12 वर्षाचा मृत्यू झाला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली.
वीणा जॉर्ज म्हणाल्या, पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेत संबंधित मुलाच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले हेते. 3 सप्टेंबरला या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान, आज पहाटे या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. या विषाणूचा धोका लक्षात घेऊन केरळ सरकारने आरोग्य विभागाच्या टीम तयार केल्या आहेत. या टीम संबंधित मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. केंद्र सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपली एक टीम केरळमध्ये पाठवली आहे.
दरम्यान, 19 मे 2018 रोजी केरळच्या कोझिकोड जिह्यात निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. 1 जून 2018 पर्यंत राज्यात 18 रुग्ण आढळले होते. तर या संसर्गामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकार पूर्णपणे अलर्ट आहे, असेही जॉर्ज यांनी सांगितले.