प्रतिनिधी / शिये
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असल्याने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा; असे आवाहन करवीर पंचायत समितीचे गटविकास सचिन घाटगे यांनी केले.
भुयेवाडी येथे पॉझिटिव्ह रूग्ण सापडला तसेच शियेतील क्रशर विभागात लाटवडे रोड, पेठवडगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात बारा जण आल्याने शिये, भुयेवाडी, निगवे दुमाला, भुये, जठारवाडी येथील पहाणी करून ग्रामपंचायतीना सुचना दिल्या.
याप्रसंगी बोलताना घाटगे म्हणाले, ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर गावातुन येणाऱ्यांनी तपासणी नंतरच गावात प्रवेश द्यावा. गावात वारंवार निर्जंतुकीकरण करावे, साठ वर्षे वरील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करणे, साथीचे आजार असणाऱ्या लोकांची तपासणी करणे. सार्वजनिक विवाह, रक्षाविसर्जन कार्यक्रमाच्या वेळी दक्षता घेणे, नोकरीनिमित्त परगावाहून ये-जा करणाऱ्यांची नियमित नोंदी ठेवणे, रुग्ण आढळून आलेला प्रति बंदीत भाग सील करणे अशाप्रकारे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहनही गटविकास अधिकाऱ्यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, सतीश कुरणे, बाबासो बुवा, जयसिंग फडतारे, तानाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी के.बी. पाटील आदी उपस्थित होते.