वैभववाडी ग्राहक पंचायतीचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी / वैभववाडी:
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी प्रशासनाने जनजागृती अभियान राबवून मास्क वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याबाबत जनतेला आवाहन करावे. तसेच सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने नियमांचे पालन न करणाऱया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत वैभववाडी तहसीलदारांकडे मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्याने जिह्यात कोरोनावर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य झालेले आहे. वैभववाडी तालुक्याचा विचार करता प्रशासनाने घेतलेली योग्य खबरदारी व जनतेने केलेल्या सहकार्यामुळे कोरोना आटोक्यात राहिलेला आहे. परंतु आता कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वैभववाडी प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा सक्तीने वापर करणे आणि शारीरिक अंतर ठेवण्यासंदर्भात आपल्याकडून योग्य प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती केल्यास जनतेचा प्रतिसाद नक्की मिळेल. आपल्या सूचना व नियमांची अंमलबजावणी न करणाऱया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई झाल्यास भविष्यात उद्भवणाऱया समस्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासन व नगरपंचायत वाभवे-वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक जनजागृती अभियान राबवून मास्क न वापरणाऱया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केल्यास सर्व नागरिक मास्कचा वापर करतील, नियमांचे पालन करतील. जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे या कोरोना महामारीपासून बचाव होण्यास मदत होईल, असे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.