वाढीसह निर्यात 34 अब्ज डॉलर्सवर-2020-21मध्ये 7.4 टक्क्यांची घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील निर्यात ही मार्च महिन्यात 58.23 टक्क्यांनी वाढून 34 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. निर्यातीमध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग, रत्ने व आभूषणे आणि औषधासारख्या वस्तुंचा वाटा अधिक राहिला असल्याचे दिसून आले आहे.
वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये निर्यात 7.4 टक्क्यांनी घटून 290.18 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. जी या अगोदरच्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये 313.36 अब्जच्या घरात पोहोचली होती.
आर्थिक वर्ष 2020-21 मधील कालावधीत आयात 18 टक्क्यांनी घटून 388.92 अब्ज डॉलर्सवर राहिली असून हा आकडा या अगोदरच्या आर्थिक वर्षात 474.71 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता.
मागच्या मार्चमधील स्थिती
मागच्या वर्षी मार्च 2020 मध्ये निर्यात 21.43 अब्ज डॉलर्सची झाली होती. कोरोना संकटाच्या कारणामुळे जागतिक पातळीवर नरमाईचा कल राहिला होता. याचा
परिणाम म्हणून मार्च 2019 च्या तुलनेत 34 टक्क्यांची घसरण राहिल्याची नेंद केली
आहे.
आयातीमध्येही वाढ
आयात 52.89 टक्क्यांनी वाढून 48.12 अब्ज डॉलर्सवर राहिली. एक वर्षाच्या अगोदर मार्च 2020 मध्ये हा आकडा 31.47 अब्ज डॉलर्सवर राहिला होता.