प्रतिनिधी/ पाटण
मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अव्वल सचिव भरत आत्माराम पाटील याने तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस भरत पाटील याचा तपास करत असताना मारूल हवेली (ता. पाटण) येथील त्याच्या निवासस्थानी पोलिसांना 42 मि. मि. रिवॉल्व्हरची 16 काडतुसे सापडली असून ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली.
भरत पाटीलसह अन्य तिघांनी दिवशी बुद्रुक येथील पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्याला रिवॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भरत पाटीलसह चार जणांविरूद्ध पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी यापैकी जितेंद्र सूर्यवंशी याला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. याच गुह्यातील एका अल्पवयीन मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. भरत पाटील व अन्य एकजण यात फरारी आहेत. याबाबत मंगळवारी रात्री तृप्ती सोनवणे यांच्या पथकाने मारूल हवेली येथील भरत पाटील याच्या वास्तूत धाड टाकली. यात भरत पाटील सापडला नाही परंतु त्याठिकाणची तपासणी केली असता तेथे 42 मि. मि. रिवॉल्व्हरची 16 काडतुसे सापडून आली. त्यानंतर ही काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. भरत पाटील हा ग्रामविकास विभाग मंत्रालयात अव्वल सचिव म्हणून कार्यरत होता. त्याची चौकशी सुरू असल्याने सन 2017/18 पासून तो निलंबित आहे. तर दरम्यानच्या काळात यापूर्वी पाटण पोलिसांत भरत पाटील याच्याविरूद्ध पाटण पोलिसांत अशा प्रकारे मारहाण, हवेत फायरिंग आदी तक्रारी दाखल झाल्या आहेत. तृप्ती सोनवणे तपास करत आहेत.