ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशाच्या खोर्धा जिल्ह्यातील चिलिका विधानसभा मतदारसंघाचे निलंबित बीजेडी आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने 23 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेत 7 पोलिसांसह 23 जण जखमी झाले आहेत. त्यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, संतप्त जमावाने जगदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.
खोर्दाचे एसपी आलेखचंद्र पाधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोर्दा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे 500 ते 600 लोक जमले होते. यावेळी चिलिका येथील निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांची कार जमलेल्या लोकांच्या अंगावर भरधाव वेगात आली. काही समजण्याच्या आतच या कारने तब्बल 23 जणांना चिरडले. त्यामध्ये एका महिलेसह 7 पोलिसांचाही समावेश आहे. दरम्यान, संतप्त जमावाने जगदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी भुवनेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.